नवी दिल्ली – राजधानी नवी दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील हे सुद्धा कोरोना बाधित झाले आहेत. आज सकाळीच त्यांनी तशी माहिती दिली आहे. तर, आता दिल्लीतील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी थेट विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दिल्लीत लॉकडाऊन राहणार आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन या अवताराने दिल्लीत चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. दररोज हजारोच्या संख्येने कोरोना बाधित आढळत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. दिल्लीतील शाळा यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. रात्रीची संचारबंदी सध्या सुरू आहे. तरीही काहीच परिणाम साधला जात नसल्याने आता केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निश्चय झाला आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊन महत्त्वाचा ठरणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल हे स्वतः कोरोना बाधित झाले आहेत. योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सरकारने सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1478262817287401472?s=20