इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमधील वुहान लॅबमधून कोरोना विषाणूची गळती झाल्याची कबुली जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस गेब्रेयसस यांनी युरोपियन नेत्याशी केलेल्या खाजगी संभाषणात दिली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, वुहानच्या प्रयोगशाळेत झालेल्या अपघातामुळे हा विषाणू पसरला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
चीनमधील वुहानमधून कोरोना संसर्ग झाला हे सत्य सार्वजनिकपणे स्वीकारणे जागतिक आरोग्य संघटनेने नेहमीच टाळले आहे. डेली मेलनेही त्या ज्येष्ठ युरोपियन राजकारण्याचे नाव उघड केलेले नाही ज्यांनी खाजगी चर्चेत कबूल केले की हा विषाणू चीनच्या वुहान लॅबमधून पसरला आहे असे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी जाहीरपणे सांगितले होते की, हा विषाणू कुठून आला आणि त्याची लागण मनुष्याला कशी झाली. व्हायरसचे मूळ ओळखणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून भविष्यात अशा साथीचे रोग टाळता येतील पण त्याबद्दल फारशी माहिती समोर येत नसल्याने हा मुद्दा छुप्या स्वरुपातच राहत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणाले की, कोरोना विषाणूचे मूळ शोधणे ही आपली नैतिकदृष्ट्या जबाबदारी आहे. कोरोनाच्या उत्पत्तीची माहिती जाणून घेण्यास जितका जास्त वेळ लागेल, तितके ते समजून घेणे अधिक कठीण होत जाईल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात जागतिक आरोग्य संघटनेने २०२१मध्ये स्थापन केलेल्या तज्ञ पॅनेलने म्हटले आहे की कोरोना संसर्गाच्या प्रारंभाबद्दल जाणून घेण्यासाठी कोणताही महत्त्वपूर्ण डेटा उपलब्ध नाही. मात्र, हा विषाणू वटवाघुळातून मानवांमध्ये आला असावा, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. चीन कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी समोर आणला आहे