लॉस अँजिलिस – कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. मात्र कमी रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्यांना खूपच काळजी घ्यावी लागत आहे. परंतु द. अफ्रिकेत एचआयव्हीबाधित महिलेला कोरोनाची बाधा झाली. पुढे काय झाले तुम्हीच वाचा…
दक्षिण अफ्रिकेत एचआयव्हीग्रस्त गंभीर महिला २१६ दिवस कोरोनाबाधित राहिल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. यादरम्यान सार्स-कोव-२ विषाणूने तिच्या शरीरात जवळपास ३२ वेळा आपले रूप बदलले. मेडआरएक्स-४ या नियतकालिकेत प्रकाशित शोधनिबंधात हा खुलासा झाला आहे.
डर्बन येथील क्वाजुलू-नेटल विद्यापीठाचे संशोधकांनी सांगितले, की ३६ वर्षीय महिलेच्या शरीरात १३ म्युटेशन (जेनेटिक उत्परिवर्तन) स्पाइक प्रोटिनमध्ये पाहिले गेले. हे तेच प्रोटिन आहेत, जे कोरोना विषाणूच्या हल्ल्याला रोखतात. जवळपास १९ परिवर्तनामध्ये विषाणू आपले रूप बदलण्यास सक्षम होता. महिलेपासून इतर लोकांना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुख्य संशोधक तुलियो डी ओलिव्हेरा सांगतात, असे रुग्ण आढळू लागले तर, कोरोना विषाणूच्या नव्या रूपाचा स्त्रोत एचआयव्ही संसर्ग असू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे बहुतांश एचआयव्ही रुग्ण संसर्गाबात संवेदनशील नसतात. तसेच त्यांच्यावर कोरोना विषाणूचा प्रभाव अधिक काळ राहू शकतो.
अशी पटली ओळख
लॉस अँजिलिस टाइम्सच्या वृत्तानुसार, एका रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणूच्या जेनेटिक संरचनेत जवळपास दोन डझन म्युटेशन असल्याचे कधी आढळले नसते. कारण महिलेमध्ये खूपच कमी लक्षणे होती. एचआयव्ही रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता तपासण्यासाठी तीनशे एचआयव्हीबाधितांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी संबंधित महिलेचाही त्यामध्ये समावेश होता. अशा प्रकारे महिलेतील कोरोनाच्या म्युटेशनबाबत माहिती मिळू शकली. ओलिव्हेरा यांनी दावा केला की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा शोध खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.