वॉशिंग्टन – भारतात धुमाकूळ घातलेल्या डेल्टा व्हेरिएंट आता जगातील इतर देशात वेगाने पसरत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जगात विक्रमी पातळीवर म्हणजेच ५० लाखांवर पोहोचली आहे. भारतात सक्रिय रुग्ण चार लाख सात हजार इतके झाले आहे. भारतात दुसरी लाट उच्चांकावर पोहोचलेली असताना सक्रिय रुग्णांचा आकडा जवळपास ३८ लाखांवर पोहोचला होता.
अमेरिकेत कोरोनाचे दैनंदिन रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासादरम्यान तिथे ४४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. एका दिवासात नवे रुग्ण आढळण्याच्या बाबतीत ब्रिटेन सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे ४६ हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. दुसर्या क्रमांकावर अमेरिका आणि भारत तिसर्या क्रमांकावर आहे. भारतात दररोज जवळपास ४२ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. ३८ हजारांहून अधिक रुग्णांसह इंडोनेशिया चौथ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, कोरोना संसर्गामुळे मृत्यू होणार्यांच्या संख्येत घट झाली आहे. वेगाने होणार्या लसीकरणामुळे ही घट झाली आहे. परंतु डेल्टा व्हेरिएंटपासून अजूनही सतर्कता बाळगायला हवी. ज्यांनी लस घेतली नाही, अशांचे मृत्यू झाले आहे तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एपी वृत्तसंस्थेनुसार, टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी तिथे कोरोनाचे रुग्णांची संख्या गेल्या सहा महिन्याच्या उच्चस्तरावर आहे. टोकियोत एका दिवसात १८३२ नवे रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जापान वैद्यकीय असोसिएशनचे अध्यक्ष तोशियो नाकागावा सांगतात, ज्या गोष्टींची चिंता होती, आता तेच होत आहे. जापानमध्ये आतापर्यंत २३ टक्के लसीकरण होऊ शकले आहे.
ब्राझील – गेल्या २४ तासात १४२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ऑस्ट्रेलिया – लॉकडाउनच्या दरम्यान नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत.
रशिया – एका दिवसात २३ हजारांहून रुग्ण आढळत आहेत.