विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोरोना साथीच्या विषयी देशभरातील लोकांना सतर्क केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. त्यामुळे लोकांनी दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होतील, त्यासाठी काळजी घ्यावी. विशेषतः महाराष्ट्र आणि केरळमध्ये अजूनही साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे आढळून आले आहे, असेही सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देश अद्याप दुसर्या लाटेवर झुंज देत असून कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले असून जनजागृती आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात देशातील एकूण संक्रमित लोकांपैकी 53 टक्के लोक महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील होते. तसेच देशातील ६६ जिल्ह्यांत संसर्ग दर अजूनही दहा टक्क्यांहून अधिक आहे.
आरोग्य सचिव अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, देशातील अनेक राज्यांमध्ये अद्याप दुसरी लाट आहे आणि कोणत्याही प्रकारच्या दुर्लक्षाला वाव नाही. पर्यटकांच्या ठिकाणी गर्दी आणि कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन ही गंभीर बाब असून अशा दुर्लक्षामुळे संसर्ग पुन्हा वाढेल. तसेच केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून १४ प्रकरणानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच शेजारील राज्ये देखील सतर्क झालेले आहेत.
रशिया आणि ब्रिटनसह काही देशांमध्ये नुकत्याच झालेल्या संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करून अग्रवाल यांनीही या संसर्गाकडे दुर्लक्ष करण्याबद्दल सावध केले. तसेच मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे यासंबंधी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील २१ टक्के आणि केरळमधील ३२ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मागील आठवड्यात १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ६६ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग दर १० टक्क्यांपेक्षा जास्त होता.