नवी दिल्ली – कोरोना विषाणूची उत्पत्ती नैसर्गिक आहे की तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, याबाबत अजूनही संशोधकांमध्ये मतभेद आहेत. प्रयोगशाळेत कोरोनाच्या उत्पत्तीचे पुरावे मिळाले नाही आणि नैसर्गिक उत्पत्तीबाबतच्या तथ्यांना अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूचा लोकांमध्ये वेगाने प्रसार होण्यास अनुरूप तयार करण्यात आल्याची शक्यता असल्याचे नेचरमध्ये प्रकाशित एका शोधनिबंधात म्हटले आहे.
अहवालानुसार, कोविड विषाणूमध्ये अनेक असामान्य गुण आहेत. त्यामध्ये जेनेटिक सिक्वेन्स सिग्नलिंगचे एक फिचर असे आहे ज्यावर तो मानवनिर्मित असल्याची शंका उपस्थित होते. त्यात पेशींमधील प्रोटिनलाही सूचना केली जाऊ शकते. सामान्य स्थितीत अशा प्रकारच्या विषाणूमध्ये आढळणार्या प्रोटिनमध्ये सिक्वेन्स सिग्नल नसतात.
एका माणसातून दुसर्या माणसात वेगाने प्रसार होण्याच्या दृष्टीनेच याला तयार करण्यात आले आहे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिक्वेन्स सिग्नलशिवाय विषाणूच्या फुरिन क्लिव्हिज साईट सुद्धा मानवनिर्मित असल्याची शंका येते. फुरिन साईट कोविड-१९ च्या स्पाईक प्रोटिनमध्ये असते. कोरोना विषाणूमध्ये ही साईट आधीसुद्धा दिसली आहे. परंतु कोविड-१९ मध्ये अधिक संक्रमित बनविणारे फिचर एकसाथ दिसत आहेत. याला आपण योगायोग म्हणू शकत नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
पुरावे नाहीत
कोरोना विषाणू नैसर्गिक असल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. विषाणूचा जिनोम हार्सशू प्रजातीच्या वटवाघुळाशी ९६ टक्के मिळताजुळता आहे. पण जर विषाणू वटवाघुळाकडून मानवी शरीरात आला असेल तर याचे प्रमाण अधिक मिळायला हवे. त्यामुळे जे संशोधक या विषाणूला नैसर्गिक मानतात, त्यांचा दावा आहे की पहिले वटवाघुळातून इतर प्राण्यांमध्ये आणि नंतर माणसामध्ये हा विषाणू आला आहे. आतापर्यंत ८० हजार संशयित प्राण्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. परंतु तो कोणत्या प्राण्यातून आला याबाबत अद्याप काहीच माहिती मिळू शकली नाही. ही बाब स्पष्ट होईपर्यंत कोरोनाची उत्पत्ती नैसर्गिक आहे हेसुद्धा स्वीकारले जाऊ शकत नाही.