नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येऊन गेल्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमालीचा घटला होता. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारांकडून कोरोना प्रतिबंध हटविण्यात आले होते. परंतु देशाच्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने, कोरोना संपला नाही, हेच अधोरेखित होत आहे. आता ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटने भारताचे दार ठोठावले आहे.
ओमिक्रॉनच्या XE या सबव्हेरिएंटचा पहिला रुग्ण भारतात आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये XE सबव्हेरिएंटने बाधित दोन रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली होती, परंतु त्याला दुजोरा मिळू शकला नव्हता. परंतु आता भारतीय SARS-COV2 जिनोम सिक्वेन्सिंग कंसोर्टियमतर्फे (INSACOG) XE सबव्हेरिएंटने बाधित रुग्ण आढळण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. INSACOG हे नेटवर्क केंद्र सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षण प्रयोगशाळेचे आहे.
एक्सई सबव्हेरिएंटने होणारा संसर्ग इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगळा असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. नवा सबव्हेरिएंट ओमिक्रॉनच्या सध्याच्या प्रमुख BA.2 या व्हेरिएंटच्या तुलनेत फक्त १० टक्क्यांहून अधिक ट्रान्समिसिबल आढळला आहे. भारतात जानेवारी आलेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉनचा BA.2 हा व्हेरिएंट जबाबदार होता.
देशात आतापर्यंत मूठभरहून कमी रिकॉम्बिनेंट व्हेरिएंट आढळले आहेत. हे सर्व भौगोलिकरित्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आले आहेत. त्यामध्ये क्लस्टर फॉर्मेशन दिसून आले नाही, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. एक्सईचे नमुने कुठून घेतले होते, याविषयी अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. परंतु दोन राज्यांमधून आढळलेल्या आणि दुजोरा न मिळू शकलेल्या नमुन्यांपैकी महाराष्ट्रामधील नमुन्यामध्ये सबव्हेरिएंट आढळला नाही, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.
देशातील १२ राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यादरम्यान, INSACOG च्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये एक्सई सबव्हेरिएंटच्या रुग्णाला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा मास्कसक्ती सुरू झाली आहे. २५ एप्रिलपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, १९ राज्यांमध्ये रुग्णसंख्या घटली आहे.