लंडन (ब्रिटन) – जगभरात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा भयावह वेगाने प्रसार होत आहे. सध्या भारतासह ४० हून अधिक देशांमध्ये शिरकाव केलेल्या ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये ब्रिटनमध्ये एकाच दिवसात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (UKSHA) चीफ मेडिकल कन्सल्टंट डॉ. सुसान हॉपकिन्स म्हणाले की, गुरुवारी २४९ नवीन रुग्णांमध्ये हा प्रकार आढळून आला असून आता एकूण रुग्णांची संख्या ८१७ वर पोहोचली आहे. मात्र या पुढे जर वाढ दर आणि दुप्पट होण्याची वेळ सारखीच राहिली, तर पुढील दोन ते चार आठवड्यांत ओमिक्रॉन फॉर्ममध्ये किमान ५० टक्के कोरोनाव्हायरस प्रकरणे दिसू शकतात. ओमिक्रॉन अत्यंत संक्रामक असल्याचा पुरावा देखील दिसून येत आहे. परंतु या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आणि नवीन स्वरूपाचा प्रसार थांबवण्यासाठी आम्ही सर्व काही करणार आहोत.
यापूर्वी देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले होते की, व्हेरिएंट दर २ ते ३ पट असू शकतो. त्याचबरोबर त्यांनी अनिवार्य फेस मास्क, घरातील मार्गदर्शक तत्त्वे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी अनिवार्य कोविड लस प्रमाणपत्र यासारख्या उपायांची घोषणा केली. कोविड प्रतिबंधाशी संबंधित कठोर नियम देशभरात आजपासून (शुक्रवारपासून ) लागू होतील.
जॉन्सन आणखी पुढे म्हणाले की, कोरानाच्या अनेक प्रकारानंतर आता आमच्याकडे ओमिक्रॉन हा विषाणूचा एक प्रकार समोर आला आहे. तसेच तो कोणत्याही स्वरूपापेक्षा खूप वेगाने पसरतो. विषाणूचा ओमिक्रॉन हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे हे लक्षात घेऊन सरकारकडून कठोर उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी देखील त्यासाठी सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.