मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामध्ये ओमिक्रॉन रुपाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ओमिक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीला तीन दिवसांनंतर लक्षणे दिसून येतात. लक्षणांच्या आधारावरून रुग्णांना घरी राहून बरे होता येते. काही रुग्णांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञ सांगतात की, सध्या ओमिक्रॉनचे अधिक रुग्ण आढळत आहेत. ओमिक्रॉनने संक्रमित झाल्यानंतर तीन दिवसात रुग्णांना लक्षणे दिसून येतात. तर दुसर्या लाटेत डेल्टा रुपाने संक्रमित होणार्या नागरिकांना चार दिवसांनंतर लक्षणे दिसत होती. अल्फा रुपाने संक्रमित झाल्याच्या पाच दिवसांनंतर लक्षणे दिसत होती. याचाच अर्थ असा होतो की कोरोनाच्या इतर रुपांच्या तुलनेत ओमिक्रॉनबाधितांमध्ये लवकर लक्षणे दिसून येतात.
असा करा घरच्या घरी उपचार
१) उपचार करणार्या डॉक्टरांच्या सातत्याने संपर्कात रहावे. कोणत्याही प्रकारे प्रकृती खालावली तर त्वरित डॉक्टरांना सूचित करावे किंवा पुन्हा रुग्णालयात जावे.
२) डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर दुसऱ्या आजारांशी संबंधित औषधेही सुरू ठेवले जाऊ शकतात.
हे जाणून घ्या
कोरोनाच्या इलाजात अँटिव्हायरल औषधे जशी मोलिनुपिरव्हीर या औषधाशिवाय मोनोक्लोनल अँटिबॉडीबद्दल मोठी चर्चा होत आहे. डॉक्टर सांगतात, ही औषधे जादूची छडी नाहीयेत. ओमिक्रॉन नवे रुप आहे आणि याच्यात मोनोक्लोनल अँटिबॉडी काम करेल की नाही हे सांगता येऊ शकत नाही.
रुग्णालयात कधी जावे
१) श्वास घेण्यास त्रास झाल्यास
२) सामान्य खोलीत ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी ९४ पेक्षा कमी असेल
३) छातीत सातत्याने दुखणे आणि जडपणा जाणवत असेल
४) मेंदू योग्य पद्धतीने काम करत नसेल, तीन-चार दिवसानंतर लक्षणे वाढली तर.
हे लक्षात घ्या
१) डॉक्टर सांगतात की, ओमिक्रॉनची बाधा झाल्यास, बहुतांश रुग्णांना घरीच लक्षणांच्या आधारावरून उपचार देऊन बरे करता येऊ शकते.
२) ज्येष्ठ नागरिक रुग्णांना ताप असेल, तर ते पॅरासिटॅमॉल ६५० एमजी ही गोळी घेऊ शकतात.
३) जर ताप खूप दिवस कायम राहिला तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेप्रोक्सिन २५० एमजी हे नॉन स्टेरॉइड औषध घेऊ शकतात.
४) जर सर्दी-पडशाची लक्षणे असतील तर सिट्रॉजिन १० एमजी किंवा लिव्होसिट्रॉजीन ५ एमजीचा वापर करू शकतात.
५) खोकला असल्यास कफ सिरपचे सेवन करू शकतात.
(महत्त्वाची सूचना – घरी उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक)