पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव निवळल्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. तसेच, मास्क सक्तीही काढून टाकण्यात आली आहे. मास्क वापरणे हे आता ऐच्छिक करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला आहे का, मास्क वापरणे आवश्यक आहे की नाही, याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञ सांगतात की, कोरोना विषाणूचे रुग्ण घटले असून, ते नीचांकी पातळीवर आले आहेत. परंतु एक विषाणूरोग तज्ज्ञ म्हणून मला वाटते, की आपण आपली सुरक्षा कमी करायला नको. आपण मास्क घालणे बंद केले तर आपल्यासाठी ते योग्य ठरणार नाही. त्याने आपला बचाव होणार नाही. चीन, सिंगापूरसह अनेक देशांमध्ये अजूनही रुग्णांचे प्रमाण अधिक आहेत. देशात अजूनही विषाणू उपस्थित आहे. दररोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. ज्या प्रकारे आपल्या देशात दळणवळणाची साधने आहेत, त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संसर्ग पसरण्यास जास्त वेळ लागत नाही. आता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूमध्ये कधी काय बदल होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही मास्क घालणे आवश्यक आहे.
विषाणूंना जैव सुरक्षा पातळी-४ या प्रयोगशाळेत ठेवले जाते. हे १०० टक्के सुरक्षित असतात. ते येथून बाहेर जाण्याची कुठलीच शक्यता नाही. लसीकरण मोहिमेत अनेकांचे प्राथमिक लसीकरण झाले आहे. असे असताना नागरिकांना बुस्टर डोस किती आवश्यक आहे, असे विचारले असता, तज्ज्ञ म्हणतात की, बुस्टर डोस देण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ज्याप्रकारे आधी प्राथमिक लसीकरण झाले, त्याच प्रकारे खबरदारीच्या डोसबद्दल सरकारी दिशानिर्देश येतील. आगामी काळात सर्वांनाच बुस्टर डोस दिले जातील.
बारा वर्षांच्या खालील मुलांना लस देणे आवश्यक आहे का, या प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात की, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाचा सहज सामना करू शकते. देशातील बहुतांश मुलांना संसर्ग झाला आहे, परंतु त्यांच्यात लक्षणे दिसून आली नाहीत किंवा खूपच कमी लक्षण होते. परंतु जी मुले गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना लस देणे आवश्यक आहे.