इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर फक्त फुफ्फुसे बाधित होत नाहीत, तर विषाणूचा यकृत आणि आतड्यांवरही मोठा परिणाम होत आहे. कोरोना विषाणू आतड्यांना पूर्णपणे ब्लॉक करतो, परिणामी गँगरीन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आतडे कापण्याची वेळ येते. अशा काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यांचा जीव वाचला त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
कोरोना संसर्गामुळे नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाले. एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंडच्या माध्यमातून ब्लॉकेज काढले जाऊ शकते. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या सभागृहात सुरू असलेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये सांगण्यात आले की, कोरोनाच्या विळख्यात आलेल्या २० रुग्णांच्या आतड्यांना सूज आली होती. त्यासोबतच आतडे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.
कोरोना संसर्गाने आतड्यामध्ये शिरकाव केल्यास अतिसाराचा त्रास सुरू होतो. कोरोना विषाणूची तपासणी लाळ आणि नाकातील द्रव्याशिवाय मलमूत्राच्या नमुन्यातूनही केली जाऊ शकते. कोरोना फक्त फुफ्फुसापर्यंत मर्यादित आहे, असा भ्रम नागरिकांमध्ये होता, परंतु आता कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांच्या आतड्यांचे नुकसान आणि गँगरीनची लक्षणे दिसून येत आहेत.
अनेक जण भ्रामक प्रचाराला बळी पडून आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली कॅप्सूल खातात, अशा रुग्णांना यकृताची समस्या निर्माण झाली आहे. इंडोस्कोपी अल्ट्रासाउंडद्वारे आतड्यांच्या बाहेरील भागाशिवाय आतमध्येही ट्यूमर ब्लॉकेज दिसून येत आहेत. यामुळे रोगाचे निदान सोप्या पद्धतीने होत आहे. स्वादुपिंडाच्या सभोतालच्या पिशवीतील पाणी काढून टाकणेदेखील सोपे झाले आहे.