नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा BA2 हा सब व्हेरिएंट दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि युरोपच्या अनेक देशांमध्ये आढळला असून, त्याचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांचाही आकडा वाढत आहे. मात्र रोगप्रतिकारक शक्ती आणि लसीकरणामुळे भारतात चौथी लाट येण्याबाबत तज्ज्ञांना जास्त काळजी वाटत नाही. सध्या भारतात कोरोनाबाधितांचे दैनंदिन प्रमाण ३ हजारांहून कमी आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार आणि आरोग्यसेवेचे महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे सांगतात, की आपल्याला सतर्कता बाळगावी लागणार आहे. जगात सर्वत्र लाटा येत असताना भारतात चौथी लाट येणार आहे. चौथी लाट कधी येईल आणि ती किती धोकादायक असेल हे सांगता येणार नाही.
डिसेंबर २०२१ आणि फेब्रुवारीदरम्यान आलेल्या तिसऱ्या लाटेदरम्यान नागरिकांची वाढलेली रोगप्रतिकारक शक्ती आणि लसीकरणामुळे नव्या लाटेबाबत तज्ज्ञांना विशेष काळजी वाटत नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील अडचणी वाढविल्या होत्या. तथापि, या व्हेरिएंटमुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण आणि मृतांची संख्या खूपच कमी असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. लसीकरणामुळे हे शक्य झाले आहे, असे तज्ज्ञांना वाटते.
महाराष्ट्र सरकारचे कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी मुंबईतील परिस्थितीबाबत सांगतात, तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला ओमिक्रॉनचे BA1 आणि BA2 हे सबव्हेरिएंट उपस्थित आहे हे आम्हाला जिनोम सिक्वेंसिंगमुळे कळले होते. नव्या लाटेचा सध्यातरी भारताला धोका नाही.
डॉ. जोशी पुढे सांगतात, BA2 भारतात आहे. इस्रायलच्या नव्या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न मानले गेले नाही. जोपर्यंत येथे नवा व्हेरिएंट येत नाही, येथे काळजी करण्याचे कारण नाही. परंतु या सर्व परिस्थितीतही आपण मास्क घालणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की SARS-CoV-2 विषाणू नागरिकांना दुसऱ्यांदा संक्रमित करू शकतो.