नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपासह त्याच्याविरुद्धाच्या लढाईच्या नियमांमध्येही बदल होत आहेत. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) या संसर्ग होणाऱ्या आजारांबाबत दिशानिर्देश प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेने आता कोरोनाबाधितांना फक्त पाच दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतासह अनेक देशात १४ दिवस विलगीकरणात राहण्याचा नियम आहे.
सीडीसीच्या दिशानिर्देशांनुसार, गेल्या दोन वर्षादरम्यान कोरोनाबाबत वैज्ञानिकांचे ज्ञान खूप वाढले आहे. याच आधारावर नवे नियम प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्तिला फक्त पाच दिवस विलगीकरणात राहावे, असे नव्या नियमात म्हटले आहे. जर कोरोनाबाधिताला पाच दिवसांनंतर लक्षणे दिसली नाहीत, किंवा २४ तासांत ताप आला नाही तर ते मास्क घालून घराबाहेर पडू शकातात. परंतु पुढील पाच दिवस मास्क घालणे आवश्यक आहे.
लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेला नागरिक कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला तर त्याला पाच दिवस विलगीकरणात राहणे आणि पुढील पाच दिवस मास्क घालणे आवश्यक आहे. जर पाच दिवस विलगीकरणात राहणे शक्य नसेल तर दहा दिवस मास्क घालणे आवश्यकच आहे. अशा रुग्णांनी पाच दिवसानंतर चाचणी करणे आवश्यक आहे. जर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर पाच दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक आहे.
कामावर परतू शकतात
सीडीसी म्हणाले, की कोरोनाचा फैलाव व्यक्तीमध्ये लक्षणे दिसल्याच्या एक दोन दिवसांपूर्वी आणि दोन-तीन दिवसांनंतर होऊ शकतो, याबद्दलचे प्रबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे आहे. जे आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, परंतु त्यांच्यात लक्षणे दिसत नसतील तर ते सात दिवसात कामावर परतू शकतात. त्यासाठी त्यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.
मास्क घालावा
ज्या आरोग्य कर्मचार्यांचे पूर्ण लसीकरण झाले असेल तसेच त्यांनी बूस्टर डोसही घेतला असेल तर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यावरही त्यांना विलगीकरणात राहणे आवश्यक नाही. परंतु त्यांना मास्क घालून सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अमेरिकेत सीडीसीच्या सल्ल्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. इतर देशही याच नियमांच्या आधारावरून त्यांचे नियम ठरवू शकतात, असे सीडीसीने म्हटले आहे.