अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या काळात बँकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक प्रकरणे ही महाराष्ट्र राज्यातील आहे. २०१९ – २० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कोरोना महामारीच्या काळात म्हणजेच २०२० – २१ मध्ये फसवणुकीची प्रकरणे निम्म्यावर आली आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत म्हणजेच पहिल्या तिमाहीत साडेसहाशे कोटींची फसवणूक झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. यात महाराष्ट्रातल्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. असे असले तरी फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये घटही झाली आहे.
गेल्या सात वर्षात १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१पर्यंत २.६२ लाख कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२०मध्ये ही रक्कम ११ हजार ५८३ कोटींवर आली आहेत. तसेच, या वर्षी आतापर्यंत ते हजार कोटींचा आकडाही गाठू शकलेले नाहीत. हा तो काळ होता जेव्हा देशात कोरोना महामारीशी संबंधित प्रकरणे शिगेला पोहोचली होती.
आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०१५ – १६ या आर्थिक वर्षापासून ते डिसेंबर २०२१पर्यंत १ लाख २५ हजार ५०८ कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली आहे. त्याचवेळी दिल्लीत ५१ हजार ०२९ कोटी, उत्तर प्रदेशात ७ हजार ४९३ कोटी, हरियाणामध्ये ३ हजार १८१ कोटी, बिहारमध्ये ३९७ कोटी, झारखंडमध्ये २२९ कोटी आणि उत्तराखंडमध्ये ३२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, ही फसवणूक समोर आल्यानंतर, बँकांच्या वतीने सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांकडे तक्रार केली जाते, त्यानंतर कारवाईदेखील होत असते.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा वर्षांत आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकांनी ७.३४ लाख कोटी रुपयांचे एनपीए वसूल केले आहेत. वसूल करण्यात आलेल्या या रकमेत बँकिंग फसवणुकीशी संबंधित रकमेचाही समावेश आहे.