न्यूयॉर्क – जगातील असा कोणताच भाग कोरोना महामारीच्या प्रकोपातून वाचलेला नाहीये. सगळ्याच वयोगटातील लोकांवर त्याचा परिणाम झालेला दिसतोय. किशोरवयीनांवर विशेष करून मुलींवर त्याचा अधिक नकारात्मक परिणाम झाला असून त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे.
याबाबत एक अभ्यास करण्यात आला असून, द लॅसेंट सायकियाट्रीमध्ये अहवाल प्रसिद्ध झाला आहे. १३ ते १८ वर्षांच्या मुले आणि मुलींच्या मानसिक आरोग्यावर कोरोनामुळे असमानता दिसून आली. महामारी येण्यापूर्वीच्या त्यांच्या मानसिक आरोग्याची तुलना सध्याच्या मानसिक आरोग्याशी करण्यात आली. महामारीमुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर अधिक विपरित परिणाम झाला आहे.
यामध्ये संशोधकांनी ५९ हजार किशोरवयीन मुला-मुलींवर अभ्यास करण्यात आला. अनेक दिवसांपासून कोणी अमली पदार्थाचे सेवन करत होते किंवा नाही, असे त्यांना या अभ्यासादरम्यान प्रश्न विचारण्यात आला. सध्या त्यांना कसे वाटत आहे आणि ते सध्या अमली पदार्थांचे सेवन करत आहे की नाही असेही त्यांना विचारण्यात आले. या माहितीची तुलना संशोधकांनी किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत आधी केलेल्या संशोधनाशी केली.
अमली पदार्थांच्या सेवनात घट
संशोधकांच्या माहितीनुसार, महामारीदरम्यान १५ ते १८ वर्षांच्या किशोरवयीन मुलांमध्ये सिगरेट, ई- सिगरेट आणि मद्याच्या सेवनामध्ये घट झाल्याचे आढळले आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील संशोधक जॉन एलेग्रांटे सांगतात, किशोरवयीन मुलांमध्ये महामारीदरम्यान अमली पदार्थांचे सेवन करण्यात अनपेक्षित घट झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते विलगीकरणात होते.
मानसिक आरोग्य खालावले
किशोरवयीन मुलांवर याआधीसुद्धा संशोधन करण्यात आले होते. त्यामध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि तणाव दोन्ही वाढल्याचे निदर्शनास आले होते. नव्या माहितीची तुलना जुन्या संशोधनाची तुलना केल्यावर लक्षात आले की, मुलांच्या अमली पदार्थांच्या सेवनात घट झाली असली तरी त्यांचे मानसिक आरोग्य आणखी खालावले आहे.