नवी दिल्ली – गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेला थोपवत नाही तोच अनेक देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. विशेषत : युरोपातील अनेक देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर वाढला असून तो वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) तसे स्पष्ट केले आहे.
डब्ल्यूएचओ म्हटले आहे की, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रकार ९६ देशांपर्यंत पोहोचला आहे. तसेच येत्या काही महिन्यांत कोरोनाचे हे अत्यंत संक्रामक रूप जगावर आपले अधिराज्य गाजवेल. व्हायरसच्या या प्रकारास ओळखण्यासाठी जिनोम अनुक्रम (जिनोम सिक्वेंन्सिंग) क्षमता मर्यादित आहे. डेल्टामुळे संसर्ग वाढत असल्याचा अहवाल अनेक देशांनी दिला आहे. या प्रकाराच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच येत्या काही महिन्यांत डेल्टा प्रकार जगभरातील अनेक देशात वर्चस्व मिळू शकेल.
गेल्या आठवड्यात, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस अॅडनॉम गेब्रेयसिस म्हणाले की, आतापर्यंत ओळखल्या गेलेल्या कोरोनातील सर्व प्रकारांपैकी डेल्टा हा सर्वात संसर्गजन्य आहे. कोरोना विषाणूविरूद्ध लस न मिळालेल्या लोकांमध्ये हा प्रकार वेगाने पसरत आहे. काही देशांनी निर्बंध शिथिल केले आहेत, ज्यामुळे जगात संसर्ग वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, अल्फा व्हेरिएंटची प्रकरणे १७२ देशांमध्ये आढळली आहेत. बीटाचे १२० आणि गामाचे ७२ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत.
डब्ल्यूएचओने युरोपमधील कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत इशारा दिला आहे. युरोपमधील प्रमुख हंस क्लूगे म्हणाले की, युरोपमधील कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये दहा आठवड्यांचा घट आता संपुष्टात येणार आहे. लोक शिस्तबद्ध नसल्यास आणखी एक लाट टाळता येणार नाही. प्रत्येक देशाने सप्टेंबरपर्यंत दहा टक्के लोकसंख्येला तरी लस द्यावी, असे आवाहन डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस यांनी केले आहे. तसेच त्यांनी इशारा दिला की, जोपर्यंत सर्वत्र साथीचा रोग जात नाही, तोपर्यंत आपण काळजी घ्यायलाच हवी.