नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीची वाटचाल पूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. केजरीवाल सरकारने प्रारंभी कोरोनाचे निर्बंध लादले. मात्र, त्याने परिणाम झाला नाही. अखेर विकेंड लॉकडाऊन करण्याचे जाहीर झाले. त्यानुसार गेल्या शनिवारी आणि रविवारी संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली. त्याद्वारेही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने अखेर आणखी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
दिल्लीतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ फूड पार्सल सेवेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच, दिल्लीतील सर्व बार, दारु दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर आता खासगी कार्यालये पूर्णपणे बंद करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सक्तीने वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारने सांगितले आहे. हजारोच्या संख्येने दररोज कोरोना बाधित आढळत असल्याने केजरीवाल सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1480775356156039168?s=20
दिल्लीतील पॉझिटिव्हीटी रेट (बाधित होण्याचे प्रमाण) हे तब्बल २५ टक्के आहे. दिल्लीपुरता हे निर्बंध लागू होणे पुरेसे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) हे निर्बंध लागू झाले तरच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असा स्पष्ट सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे दिल्लीशी सीमा लागून असलेल्या अन्य राज्यांकडून काय पावले उचलली जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.