बीजिंग – कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा स्त्रोत शोधण्यासाठी अमेरिकेतील गुप्तचर संस्थांना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आदेश दिले आहेत. जगभरातील वैज्ञानिकांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यावर नवनवे खुलासे दररोज पुढे येतात. या विषाणूचा जन्म चीनमधील प्रयोगशाळेतच झाला, असा दावा करणारा आणखी एक खुलासा पुढे आला आहे.
वारंवार यासंदर्भातील दावे आता एकाच दिशेने जात आहेत. त्यामुळे कोरोना महामारीने जगाची वाताहत होण्यात चीनचाच मोठा हात आहे, याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. येल विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट अकिको इवासाकी यांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला विषाणूचे संक्रमण वाढण्याबाबत फारशी तार्किक चर्चा होत नव्हती. अधिकांश लोक एका प्राण्यामधून माणसात संक्रमित झालेला रोग मानत होते. अनेकांनी तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांचे षडयंत्र असल्याचा निर्वाळाही देऊन टाकला होता. मात्र जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) तपास करीत असताना चीनच्या संशयास्पद व्यवहाराने अनेक धागे विस्कटत गेले.
या महिन्यात सायन्स पेपरमध्ये इवासाकी यांच्यासह जगातील १८ वैज्ञानिकांनी वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणू लिक झाल्याच्या शंकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा केला आहे. अर्थात हा शोध आश्वस्त करणारा नाही, पण विश्वास ठेवण्यासारखा नक्कीच आहे, असेही काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
वुहानच्या प्रयोगशाळेतून विषाणू लिक झाल्याचेच हे प्रकरण आहे असे सरसकट म्हणता येणार नाही, मात्र प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर पडला नाही, असे कुणी म्हणत असेल तर त्याचेही समर्थन करता येणार नाही, असेही काही वैज्ञानिक म्हणतात.
प्रयोगशाळेतील डेटा नष्ट
लस तयार करण्यासाठी कोरोना नमुन्यांचे संशोधन केले असता विषाणूत एक विशिष्ट फिंगरप्रिंट आढळले. प्रयोगशाळेत विषाणूसोबत छेडछाड केल्यामुळेच असे चिन्ह तयार होतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. वुहान प्रयोगशाळेत डेटा नष्ट करून ते लपविण्याचा प्रयत्न झाला आहे, असाही दावा करण्यात आला आहे.