नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने देशात तयारीला वेग दिला आहे. देशात कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यासोबतच कोरोना बाधित व्यक्तींच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तपासणीपासून ते भरतीपर्यंतच्या व्यवस्थेचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. दरम्यान, जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पुढील ४० दिवस महत्त्वाचे असणार आहेत. कारण जानेवारीमध्ये भारतात कोविड-१९ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रथम, असे आढळून आले आहे की कोविड-१९ ची नवीन लाट पूर्व आशियामध्ये आल्यानंतर सुमारे ३०-३५ दिवसांनी भारतात येते.” आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, संसर्गाची तीव्रता कमी असेल. लाट आली तरी मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी असेल. गेल्या दोन दिवसांत बाहेरून आलेल्यांवर केलेल्या ६ हजार चाचण्यांपैकी ३९ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया दिल्लीतील विमानतळाला भेट देऊन तेथील चाचणी आणि स्क्रीनिंग सुविधांचा आढावा घेणार आहेत.
शनिवारपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांसाठी सरकारने कोरोना विषाणू चाचणी अनिवार्य केली आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, बँकॉक आणि सिंगापूर येथून येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी पुढील आठवड्यापासून हवाई सुविधा फॉर्म भरणे आणि RT-PCR चाचणी ७२ तास अगोदर घेणे बंधनकारक असू शकते. चीन आणि दक्षिण कोरियासह काही देशांमध्ये कोविड -१९ प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, सरकारने एक इशारा जारी केला आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
नव्याने झालेल्या कोरोना वाढीचा सामना करण्यासाठी देशाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री मांडविय यांनी बैठका घेतल्या आहेत. कोविड १९ संसर्गाच्या कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी मंगळवारी संपूर्ण भारतातील आरोग्य सुविधांवर मॉक ड्रिल घेण्यात आल्या, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, जगभरातील प्रकरणे वाढत असताना देशाने सतर्क राहणे आणि तयारी करणे आवश्यक आहे.
Corona Virus Cases Will Increase in Mid January
Health India Infection Wave









