इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना महामारीने जगाला पुन्हा एकदा घाबरवायला सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियामध्ये या संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत तिथे १.४८ लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर चीनमधील परिस्थितीही खूपच बिघडली असून संसर्गाची २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण नोंदवले गेले. भारतात मात्र परिस्थिती अतिशय सामान्य आहे. सध्या फक्त ११ हजार सक्रिय रुग्ण आहेत. दररोज समोर येणारे बाधित देखील फारसे जास्त नाहीत.
कोरियामध्ये कोविडचे रुग्ण वाढत असल्याने त्यामागचे कारण शोधले जात आहे. ही वाढ ओमिक्रॉन आणि त्याचे सबवेरियंट ba.2 मुळे झाली असून हा वेरियंट अत्यंत संसर्गजन्य आहे. मार्च महिन्याच्या मध्यात त्याचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. या संसर्गाचा प्रसार मोठ्या शहरांबरोबरच इतर भागांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे.
चीनमध्येही कोरोनाची स्थिती अत्यंत वाईट आहे. कडक निर्बंध असूनही चीनमध्ये कोरोनाची विक्रमी प्रकरणे समोर येत आहेत. बुधवारी गेल्या २४ तासांत २६ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. भारताला शांघायमधील काऊन्सिलिंग सेवा बंद करावी लागली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने बुधवारी सांगितले की, शांघायमध्ये गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ११८९ नवीन प्रकरणे आढळून आली आहेत आणि अशा २५ हजार १४१ संक्रमित लोकांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आले नाहीत. वाढलेल्या या प्रकरणांमुळे आरोग्य सेवांवरील भार वाढला आहे.
भारतात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५८वर
भारतामध्ये एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १ हजार ७ नवीन प्रकरणे समोर आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ५८वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी ८ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एका रुग्णाच्या मृत्यूसह, संसर्गामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या ५ लाख २१ हजार ७३७ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी ०.०३ टक्के आहे, तर कोविड १९ मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.७६ टक्के आहे.
आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत १८८ प्रकरणांची वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दैनिक संसर्ग दर ०.२३ टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर ०.२५ टक्के इतका आहे. तसेच, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या आतापर्यंत ४ कोटी २५ लाख ६ हजार २२८ झाली आहे. तर मृत्यू दर 1.21 टक्के आहे. आकडेवारीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 186.22 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.