इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगासह भारतात कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात आलेली असताना, चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाउनसारखे प्रतिबंध लावण्यास सुरुवात केली आहे. शेनझेन शहरात कोरोना लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे शहरात राहणारे १.७ कोटी नागरिक आपल्या घरात कैद झाले आहेत. त्यापूर्वी चीनच्या स्थानिक प्रशासनाने प्रथमच कोरोना रॅपिड अँटिजन तपासणी सुरू केली आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. येथे शनिवारी ३,३०० हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन वर्षांमधील ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार, स्थानिक संसर्गाचे १,८०७ रुग्ण आणि १,३१५ लक्षणे नसलेले रुग्ण आढळले आहेत. जिलिनच्या ईशान्य प्रांतात २,१०० हून अधिक रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. बाहेरून आलेले २०० कोविड रुग्णांची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील शेनझेन शहरात लॉकडाउन लावण्यात आला आहे.
बीजिंगमध्येही निर्बंध लागू
शांघायमध्ये शाळा-पार्क बंद करण्यात आले आहेत. बीजिंगममध्ये निवासी क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नवे रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन बीजिंग प्रशासनाने केले आहे. परिसरात कोरोनाची लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली तर नाही ना, अशी भीती हाँगकाँगचे नेते कॅरी लाम यांनी व्यक्त केली आहे. आम्ही संसर्गाची पातळी पार केली आहे हे सांगणे इतके सोपे नाही. आम्हाला खूप सतर्कता बाळगावी लागणार आहे, असे ते म्हणाले.