नवी दिल्ली – कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीच्या मिश्रीत डोसचे निष्कर्ष समाधानकारक आले आहेत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे. दोन्ही लशीचे डोस एकत्र केल्यानंतर कोरोनाविरोधात सुरक्षित लस निर्माण झाली असून, लशीमुळे रोग प्रतिकारक शक्तीसुद्धा वाढल्याचे संशोधनात निदर्शनास आले आहे. संशोधनातील अहवालाचे निष्कर्ष अधिक परिणामकारक मिळाल्यास कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड मिश्रीत डोसला केंद्राकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला अधिक व्यापक आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
वेल्लोर येतील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयाला कोविडच्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रणाच्या क्लिनिकल परीक्षणाला परवानगी द्यावी, अशी शिफारस केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या एका तज्ज्ञांच्या समितीने केली होती. त्यानंतर त्याला परवानगी देण्यात आली.भारत बायोटेकला त्यांच्या कोवॅक्सिन आणि प्रशिक्षण सुरू असलेल्या संभाव्य अॅडेनोव्हायरल इंट्रानॅसल बीबीव्ही १५४ या लशीच्या परस्पर परिवर्तनाच्या संशोधनाला मंजुरी द्यावी अशी शिफारससुद्धा करण्यात आली होती. परंतु संशोधनातून परस्पर परिवर्तन शब्द हटवून मंजुरीसाठी संशोधित प्रोटोकॉल जमा करण्यास भारत बायोटेकला सांगण्यात आले होते.
३०० स्वयंसेवकांवर परीक्षण
विषय तज्ज्ञांच्या समितीने सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर वेल्लोरच्या सीएमसीला चौथ्या टप्प्याच्या क्लिनिकल परीक्षणासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रणावर संशोधन करण्यासाठी ३०० सुदृढ स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला.
संशोधनाचा हेतू काय
या संशोधनातून निष्पन्न करायचे आहे की, एका व्यक्तिच्या पूर्ण लसीकरणासाठी दोन वेगवेगळ्या लशींचे डोस दिले जाऊ शकतात. म्हणजेच कोवॅक्सिनचा एक डोस आणि दुसरा कोविशिल्डचा डोस. बायोलॉजिकल-ईतर्फे ५ ते १७ वर्षांच्या लोकांवर लशीच्या दुसर्या-तिसर्या टप्प्यांच्या क्लिनिकल परीक्षण करण्यास दिलेल्या निवेदनावरही चर्चा करण्यात आली.