नवी दिल्ली – देशात, गेल्या 24 तासांत, 48,786 नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. गेले 4 दिवस सलग, नव्या कोविड बाधितांची संख्या रोज 50 हजारांहून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.देशातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत देखील सतत घसरण होत आहे. भारतातील आजची सक्रीय रुग्णसंख्या 5,23,257 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत, एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 13,807 ने कमी झाली आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण भारतातील एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 1.72% इतके आहे.
अधिकाधिक व्यक्ती कोविड-19 संसर्गातून मुक्त होत असल्यामुळे, देशात आता एका दिवसात कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 49 व्या दिवशी दैनंदिन स्तरावरील नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या 24 तासांत 61,588 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले.
एका दिवसात नव्याने बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत, गेल्या 24 तासांत, 12 हजाराहून जास्त (12,802) व्यक्ती कोविडमुक्त झाल्या आहेत.
महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड बाधित झालेल्यांपैकी 2,94,88,918 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 61,588 कोरोना रुग्ण बरे झाले. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 96.97% झाला असून या दराचा सतत चढता कल दिसून येतो आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढविण्यात आला असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात एकूण 19,21,450 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 41 कोटी 20 लाखांहून अधिक (41,20,21,494) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच, दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरातही सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.64% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.54% इतका आहे. सलग 24 व्या दिवशी हा दर 5% हून कमी राहिला आहे.
33 कोटी 57 लाखांवर लसीकरण
देशातील लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येत वाढ होऊन ती काल 33 कोटी 57 लाखांवर पोहोचली. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 44,75,791 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 33,57,16,019 मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत, लसीच्या 27,60,345 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील विविध गटांच्या लसीकरणाचा समावेश आहे:
देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. केंद्र सरकार, देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग तसेच व्याप्तीचा विस्तार वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे.