नाशिक : फाळके स्मारक भागातील उड्डाणपुलावर वाहनाखाली उतरून उलट्या करीत असतांना भरधाव आयशर मालट्रकने धडक दिल्याने कारचालकाचा मृत्यु झाला. बशीर शमशुद्दीन शेख (४८ रा.आयुबनगर,मालेगाव) असे अपघातात ठार झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर चालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शेख मंगळवारी मुंबई येथून मालेगावच्या दिशेने होंडा सिटी (एमएच ४१ व्ही ७८४८) घेवून येत असतांना हा अपघात झाला. वाटेत त्यांना अचानक ऊलट्या होवू लागल्याने ते फाळके स्मारक समोरील उड्डाणपूलावर थांबले होते. वाहना खाली उतरून काही अंतरावर उलट्या करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात शेख यांचा मृत्यु झाला. ट्रक चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी मुजफ्फर खान (रा.मालेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.