नाशिक – पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी दिली. वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींचे शनिवारी स्वॅब सॅम्पल घेतल्यानंतर त्यात या मुली पॅाझिटिव्ह आढळल्या. सोमवारी महापालिका पथकाने वसतिगृहात जावून पाहणी केली. या १७ विद्यार्थिनीं पॅाझिटिव्ह आल्यानंतर त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी सांगितले की, गरज भासल्यास या मुलींना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे. मुलांच्या वसतिगृहातही अशाप्रकारे तपासणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या अहवालाबाबत माहिती मिळाली नाही.