नाशिक : कारागृहातून संचितरजा घेवून बाहेर पडलेल्या सराईत पिस्तूल धारीस पोलीसांनी अटक केली. खूनाच्या गुह्यात तो जेलमध्ये शिक्षा भोगत असून शहर पोलीस दलात त्याच्याविरूध्द दोन खूनाचे तर अन्य ठिकाणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. योगेश दादा गांगुर्डे (३० रा.भाबड वाडा) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. खूनाच्या गुह्यात शिक्षा भोगत असलेला सराईत गांगुर्डे कारागृहातून बाहेर पडला असून त्याच्या कडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती युनिटचे कर्मचारी महेश साळुंके यांना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरूवारी (दि.१८) सापळा लावला असता संशयीत पोलीसांच्या जाळ््यात अडकला. गांगुर्डे यास त्याच्याच घरात अटक करण्यात आली असून त्याच्या अंगझडतीत पिस्तूल व जिवंत काडतुसे असे सुमारे ३१ हजार रूपये किमतीचे अग्निशस्त्र मिळून आले आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.