विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच आता पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका असल्याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . विशेषतः केरळ आणि मिझोरममध्ये दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मेघालय आणि मणिपूरमध्ये कोरोना संसर्ग जास्त आहे. लहान मुलाला संसर्ग होण्याची शक्यता असते, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
लशीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा म्हणाले की, सेरो सर्वेक्षणातून असे दिसून आले की, मुलांमध्ये संसर्ग प्रौढांसारखाच आहे, काही ठिकाणी लक्षणे असलेली प्रकरणे कमी आहेत, परंतु याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. तर एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले, गेल्या दिड वर्षात कोरोनाकाळात निर्बंधांमध्ये सर्वजण घरीच असल्याने आता अनेक लोक मुलाबाळांसह प्रवास करत आहेत, त्यामुळे संक्रमित लहान मुलांची संख्या वाढू शकते. त्यामुळे मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, मुलांसाठी तयारी पूर्ण ठेवावी लागते. तसेच रुग्णालयांतील सुविधांची काळजी घ्यावी लागते. दहा वर्षांखालील मुलांमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या मार्चपासून वाढली आहे. केरळ, मिझोराम, मेघालय आणि मणिपूरमध्ये मुलांमध्ये संसर्ग जास्त असून येथे एका दिवसात १५०२ प्रकरणांपैकी ३०० मुलांमध्ये हा विषाणू आढळला आहे.
काही राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. एका दिवसात ३० हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत १०० पेक्षा जास्त वाढ झाली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की एका दिवसात कोरोनाची ३०,५७० नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि ४३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले की, लसीचा बूस्टर डोस सरकारच्या प्राधान्यक्रमात नाही. लशीच्या बूस्टर डोसबाबत वेगवेगळे अभ्यास झाले आहेत, परंतु त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बूस्टर डोससाठी आग्रह करण्याची गरज नाही. दोन डोस लशीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे हे सरकारचे पहिले उद्दिष्ट आहे.