विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशभरात कोरोना महामारी मुळे अनेकांचे नुकसान झाले. परंतु आपले माता – पिता तथा पालक गमावलेल्या मुलांचे सर्वाधिक नुकसान झाले. आता ही मुले निराधार झाले असून त्यांच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दरमहा आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मात्र आता कोरोनामुळे पालक गमावलेल्या या मुलांचे मासिक मानधन २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाऊ शकतो.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, महिला व बालविकास मंत्रालयाने या निराधार मुलांसाठी मासिक वेतन आता ४ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात सरकारने मे महिन्यात घोषणा केली होती की, अनेक मुलांना कोरोनामुळे त्यांचे पालक आणि पालक गमावले आहेत त्यांना ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत मदत दिली जाईल. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३,२५० अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ६६७ अर्ज संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत. यासाठी ४६७ जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविले होते की, त्यांनी कोरोना महामारीमुळे आपले पालक गमावलेल्या मुलांना ओळखण्यासाठी व सर्वेक्षणासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत.
महिला आणि बालविकास मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, अशा मुलांचा तपशील देण्याच्या सूचना दिल्या असून त्यांना त्वरित मदत मिळू शकेल, यासाठी कार्यवाही करावी असे म्हटले आहे. तसेच मंत्रालयाने यासाठी ‘हेल्प डेस्क’ स्थापन केला आहे. आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पोलीस, जिल्हा बाल संरक्षण युनिट (डीसीपीयू), चाईल्डलाइन (1098) आणि नागरी समाज संस्थांच्या मदतीने या मुलांना ओळखण्यासाठी मोहीम राबवण्यास सांगितले आहे.