नवी दिल्ली – देशात तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने केंद्र सरकारची काळजी वाढली असून त्यातच आर फॅक्टरने डोकेदुखी निर्माण केली आहे. हा आर फॅक्टर म्हणजेच कोरोना विषाणूचा प्रजनन दर. आर फॅक्टर सातत्याने वाढत असल्याने तिसऱ्या लाटेत संसर्ग अधिक होण्याचीही शक्यता आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर-फॅक्टर वाढत आहे, तर सात राज्यांमध्ये तो स्थिर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क केले आहे. कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
आर-फॅक्टर म्हणजे काय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. ते सांगतात, देशात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये आर-फॅक्टर सर्वाधिक १.४ वर पोहोचला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होत आहे. म्हणजेच या दोन्ही राज्यांमध्ये १०० बाधित लोक दुसर्या १४० लोकांना बाधित करत आहेत. अशाच प्रकारे लक्षद्वीपमध्ये १.३, तामिळनाडू, मिझोरम आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १.२ आणि केरळ, पुद्दुचेरीमध्ये १.१ आर-फॅक्टर आहे.
महाराष्ट्राला दिलासा
एकापेक्षा अधिक आर-फॅक्टर असण्याचा अर्थ हा आहे की, या राज्यांमध्ये एक बाधित व्यक्ती एकाहून अधिक व्यक्तींना बाधित करत आहे. याच फॅक्टरमुळे तिसर्या लाटेचा अंदाज अधिक बळकट होत आहे. नागालँड, हरियाणा, मेघालय, गोवा, झारखंड, दिल्ली आणि बंगालमध्ये आर फॅक्टर एकवर स्थिर आहे. या राज्यांमध्ये रुग्ण वाढलेही नाहीत आणि कमीही झाले नाहीत. फक्त आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात आर फॅक्टरची घट दिसत आहे. नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोना लसीकरणासाठी गठित टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल सांगतात, ०.६ च्या खाली आर-फॅक्टर आला तरच संसर्ग नियंत्रणात आहे, असे आपण मानू शकतो. या दरात वाढ होत असेल तर संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होते.
देशात आर-फॅक्टर सरासरी १.२
भारतात आर-फॅक्टर १.२ वर पोहोचला आहे. २२ जुलैच्या आधी आर-फॅक्टरमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. दुसर्या लाटेत ९ मार्च ते २१ एप्रिलच्या दरम्यान आर-फॅक्टर १.३७ वर आला होता. परंतु मे मध्ये त्यात घट झाल्यानंतर दुसरी लाट ओसरली. जूनमध्ये तो ०.७८ वर स्थिरावला होता. देशात आर-फॅक्टर सरासरी १.२ टक्क्यांवर पोहोचला असून, ही बाब तिसर्या लाटेसाठी गंभीर मानली जात आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारखे देश कोरोनाच्या तिसरी लाटेचा सामना करत आहेत. या देशांमध्ये आर-फॅक्टर १.२ वर आहे.
राज्यांनी व्हावे सतर्क
वाढत्या आर-फॅक्टरच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क व्हावे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना लव अग्रवाल यांनी केल्या आहेत. देशातील ४४ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक कोरोना संसर्गाचा दर असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. ती केरळ आणि ईशान्यकडील राज्यांत मर्यादित आहे. देशाच्या २२२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट होत आहे. परंतु १८ जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत. या जिल्ह्यांपैकी १० जिल्हे केरळमधील आहेत. याच १८ जिल्ह्यांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण आढळत आहेत, असे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.