नवी दिल्ली – देशात कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशासह देशातील १६ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. जगातील प्रत्येक सहावा नवा बाधित व्यक्ती भारतात आढळत आहे. यावरूनच देशातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. मध्य प्रदेशात भोपाळमध्ये कोरोनारुग्ण वाढल्याने पूर्ण लॉकडाउन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. भोपाळमध्ये मंगळवारी रात्री ९ वाजेपासून १९ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लावण्यात आला आहे.
यांनाही टाकले मागे
एकूण रुग्णसंख्येत ब्राझीलला मागे टाकत भारत दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिकेत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज भारताहून अधिक नवे रुग्ण आढळत होते. सध्या दोन्ही देशात जेवढे नवे रुग्ण आढळत आहेत, त्याहून अधिक एकट्या भारतात रुग्ण आढळत असल्याने गंभीर परिस्थितीचा अंदाज लावता येऊ शकेल. गेल्या २४ तासात भारतात१,६८,९१२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर अमेरिकेत जवळपास ४८ हजार आणि ब्राझिलमध्ये ३८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत.
बाधितांचा आलेख चढाच
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, तेलंगण, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि बंगालमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. या राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांची संख्या १.३५ कोटींहून अधिक झाली आहे. ब्राझिलमध्ये एकूण १.३४ कोटी आणि अमेरिकेत ३.१९ कोटी लोक बाधित आहेत.
मृतांचा आकडा अधिक
कोरोना संसर्गामुळे ९०४ लोकांचा मृत्यू झालेला आहे. १८ ऑक्टोबर २०२० नंतर एका दिवसात झालेला मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. यासोबतच मृतांचा आकडा १,७०,१७९ पर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत बाधितांपैकी एकूण १.२१ कोटींहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. परंतु बरे होण्याचा दर घटून ९० टक्क्यांहून खाली म्हणजेच ८९.८६ टक्क्यांवर आला आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे मृत्यूदरही घटून १.२६ टक्क्यांवर आला आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिलला रात्रीपासून लॉकडाउन लावू शकतात. परंतु लॉकडाउनची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयामुळे सरकार एक दोन दिवसात लॉकडाउन लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये १९ एप्रिलपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत कोरोना कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या २४ तासात ८२४ रुग्ण आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना कर्फ्यूदरम्यान किराणा दुकानांमधून होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. भाजीपाला आणि दुधाचे दुकाने सुरू राहणार आहेत. बँका, पेट्रोल पंपदेखील सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यापूर्वीच १२ शहरांमध्ये लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये इंदूर, जबलपूर, उज्जैन आणि विदिशा या शहरांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात कोरोनाची दुसरी लाट भयानक रूप घेत आहे. रुग्णसंख्येत सलग वाढ होत आहे. लखनऊनंतर पाच शहरांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढली आहे. लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी उत्तर प्रदेशात १३,६८५ नवे रुग्ण आढळले असून, ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. लखनऊमध्ये ३,८९२ सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.