नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात कोरोना मुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने आज 2 कोटीचा टप्पा (2,00,79,599) पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 83.50% आहे. गेल्या 24 तासात 3,44,776 रुग्ण बरे झाले. गेल्या चार दिवसात सलग तिसऱ्यांदा, बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त आहे. नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 71.16% हे दहा राज्यातले आहेत.
भारतातली उपचाराधीन रुग्ण संख्या आज 37,04,893 पर्यंत घटली आहे. ही संख्या देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 15.41% आहे. गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्ण संख्येत 5,632 ने घट झाली आहे. देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी 79.7% रुग्ण 12 राज्यात आहेत.
“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाचा अवलंब करत, जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे केंद्र सरकारकडून, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना अतिशय त्वरेने वितरण जारी आहे. आतापर्यंत एकूण 9,294 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 11,835 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,439 व्हेंटीलेटर्स/बाय पॅप आणि रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 4.22 लाख कुप्या रस्ते आणि हवाई मार्गाने वितरीत/ पाठवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रा आज 18 कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 26,02,435 सत्रांद्वारे 17,92,98,584 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,18,127 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 66,04,549 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,43,22,390 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 81,16,153 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 39,26,334 लाभार्थी ( पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,66,09,783 ( पहिली मात्रा ), आणि 85,39,763 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षावरील 5,42,42,792 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 1,73,18,693 (दुसरी मात्रा ), यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.75% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,40,706 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 39,26,334 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 20 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या 118 व्या दिवशी (13 मे 2021) ला 20,27,162 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 18,624 सत्रात 10,34,304 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 9,92,858 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
गेल्या 24 तासात 3,43,144 नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी 72.37% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 42,582 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर केरळमध्ये 39,955 तर कर्नाटकमध्ये 35,297 नव्या रुग्णांची नोंद झाली.
राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.09%.आहे. गेल्या 24 तासात 4,000 रुग्णांचा मृत्यू झाला यापैकी 72.70% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 850 जणांचा मृत्यू झाला, कर्नाटक मध्ये 344 जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र अपडेट:
कोरोना विषाणूबाबत संशोधन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेने आरोग्य विभागातले तज्ञ आणि डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे. कोरोना विषाणूचे विविध प्रकार (स्ट्रेन) आणि त्यांचा मानवावर होणारा परिणाम इत्यादी बाबत ही समिती विश्लेषण करणार आहे.नवीन विषाणू आणि त्यांचे परिणाम यावरही ही समिती लक्ष ठेवणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. विविध रोगांवर उपचार करण्यासाठी एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याचीही महानगर पालिकेची योजना आहे. महाराष्ट्रात गेल्या सलग पाच दिवसात 50 हजारापेक्षा कमी नव्या कोविड-19 च्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात गुरुवारी नव्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली. राज्यात 13 मे रोजी 42 हजार 582 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. 12 मे रोजी ही रुग्णसंख्या 46 हजार 781 होती.
गोवा अपडेट:
गोव्यात येत्या शनिवारपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण मोहिम राबवली जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. राज्यातल्या 35 सरकारी केन्द्रावर ही लस मोफत दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. राज्य सरकारकडे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशील्ड लशीच्या 32 हजार 870 मात्रा प्राप्त झाल्या आहेत. गोव्यात दैनंदिन रुग्ण आढळणाऱ्या दरात लक्षणीय घट दिसून येत आहे. या दरात (पॉझिविटी रेट) 41.40% वरुन 35.16% इतकी घट झाली आहे. बाम्बोलिम इथल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या प्राणवायू संदर्भातल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी त्रि-सदस्यीय समिती स्थापन केली. आयआयटी गोव्याचे संचालक डॉ. बी के मिश्रा या समितीचे अध्यक्ष असतील.