सुरगाणा – तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पंचायत समिती सभागृहात संबंधित अधिकारींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी आमदार नितीन पवार, माजी आमदार जे.पी.गावित, तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी भावसार, रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलिप रणवीर, सभापती मनीषा महाले, पंचायत.स.सदस्य एन.डी.गावित, सुवर्णा गांगोडे, चिंतामण गावित, सुभाष चौधरी, पोलिस अधिकारी निलेश बोडखे, राजेंद्र लोखंडे आदींसह अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलिप रणवीर यांनी सुरगाणा शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली असता सादर करण्यात आलेली कागदावरील माहिती व प्रत्यक्षात असलेली माहिती यात सुसुत्रता नसून गावा गावात जाऊन नागरिकांमध्ये कोरोना बाबतीत जनजागृती करून तपासणी करून घ्यावी. त्यानंतर खरी आकडेवारी बाहेर येईल अशी सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली. असंख्य नागरिक हे त्रास जाणवत असताना गैरसमजुतीमुळे सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेलो तर पॉझिटिव्ह ठरवून तिथेच दाखल करून घेतील. केवळ या भीतीमुळे असे रूग्ण ग्रामीण रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता तालुक्यातील बोगस डॉक्टर कडे उपचारासाठी जात आहेत. यामुळे काही रुग्ण दगावले आहेत तर पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होत आहे.
तालुक्यात जवळपास ३५ बोगस डॉक्टर असून अशा डॉक्टरांवर अद्यापही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. याठिकाणी रुग्णांची गर्दी होत असल्याने परिणामी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळेच पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढत आहे. दगावलेल्यांमध्ये कमी वयाचे असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई झाल्यास तेथील गर्दी कमी होऊन तिथे जाणारे रुग्ण उपचारासाठी सरकारी रुग्णालयात येतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदतच होईल. त्यासाठी अशा बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याने तशी अंमलबजावणी करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना झिरवाळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी रणवीर यांना दिली. तसेच ज्यावेळी एखादा सिरियस पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी पुढे गेल्यावर त्याचे काय झाले याची माहिती घेता की नाही. नसेल तर ती घेत जा असे सांगितले. जिथे हॉट स्पॉट आहेत व ज्यांच्याकडे स्वतंत्र व्यवस्था नाही अशा ठिकाणी कॉरंटाईन साठी तेथील शाळेत व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आढावा बैठकीनंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालय हे कोविड सेंटर केले जाणार असल्याने याठिकाणी जाऊन येथील आॅक्सिजन सुविधेची पाहणी केली. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रूग्णसंख्या वाढत असताना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर सोबतच स्टाफची देखील कमतरता आहे. येथील डॉक्टर स्वता पॉझिटिव्ह झाले असून ते उपचार घेत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाही. तसेच इतर डॉक्टर, परिचारिका आदींच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याची व डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
….
भीतीपोटी गैरसमज
सुरगाणा तालुक्यात कोरोना बाबतीत भीतीपोटी गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज असून त्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पोलिस पाटील आदींनी स्वता लस घेऊन आदर्श घालून द्यावा आणि नागरिकांमध्ये जनजागृती करून गैरसमज दूर करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन या आढावा बैठकीत करण्यात आले.
….
सर्व सामान्य जनता अनभिज्ञ
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व स्टाफची गेल्या काही वर्षांपासून कमतरता असून याठिकाणी गंभीर रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी पाठविताना रुग्ण रस्त्यातच दगावतो. या ठिकाणी सुविधा संपन्न उपजिल्हा रुग्णालयात व्हावे ही फार जुनी मागणी आहे. ही मागणी मंजूर झाली असल्याचे समजते. मंजूर असेल तर प्रत्यक्षात कधी निर्माण होईल यापासून मात्र सर्व सामान्य जनता अनभिज्ञ आहे.
…..
प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी
सुरगाणा तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष असून येथील आरोग्य यंत्रणेला तसेच रूग्णांना जी काही आवश्यक सुविधा लागते ती पुरेपूर दिली जाईल. नागरिकांनी भीती न बाळगता स्वताच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामीण रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. —
नितीन पवार, आमदार
…..