लंडन – कोरोनाविरोधात लढा देताना अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आणखी उपायांवर संशोधन सुरू आहे. या सगळ्या कसरतीत तोंड स्वच्छ धुतल्यानेही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकेल, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
या सोप्या पद्धतीमुळे घातक विषाणूला तोंडाद्वारे फुफ्फुसात जाण्यास रोखता येऊ शकेल. शिवाय रुग्णाला गंभीर होण्यापासूनही वाचवता येईल. या कामासाठी माउथवॉशची मदत होऊ शकेल.
ओरल मेडिसिन अँड डेंटल रिसर्च पत्रिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, काही स्वस्त आणि व्यापकरित्या उपलब्ध माउथवॉश सार्स-कोव-२ विषाणूला निष्क्रीय करण्यासाठी खूपच प्रभावी ठरत आहे, अशा प्रकारचे पुरावे मिळाले आहेत.
जर कोणी हिरड्यांच्या समस्येमुळे हैराण असेल, तर कोरोनाचा विषाणू थेट त्याच्या रक्तात पोहोचू शकतो. दातासंदर्भात समस्या असल्यास विषाणू तोंडावाटे फुफ्फुसात पोहोचू शकतो. असे झाल्यास संसर्गाचे रूप अधिक गंभीर होऊ शकते. या निष्कर्षांमुळे लोक तोंडाच्या आरोग्याची प्रभावीरित्या काळजी घेऊ शकणार आहेत, असा संशोधकांचा दावा आहे.
फक्त तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास संसर्गाला गंभीर होण्यापासून आपण वाचवू शकतो. या सोप्या पद्धतीमुळे अनेकांचा जीवही वाचू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.