टोकिओ – कोरोना बाधित महिलेच्या शरीरात फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात जपानी शल्यचिकित्सकांना मोठे यश मिळाले आहे. यापुर्वी मृत व्यक्तिच्या शरीरातील फुफ्फुस काढून जिवंत व्यक्तिच्या शरीरामध्ये प्रत्यारोपणाची अनेक यशस्वी ऑपरेशन्स जगभरात करण्यात आली आहेत, परंतु सजीव व्यक्तिच्या फुफ्फुसातील काही भाग काढून प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
क्योटो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने सांगितले की, 11 तासांच्या प्रयत्नानंतर 30 डॉक्टरांची टीम त्यात यशस्वी झाली. महिलेच्या फुफ्फुसामध्ये तिच्या पतीच्या आणि मुलाच्या फुफ्फुसांचा काही भाग पुनर्स्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे फुफ्फुसांचे नुकसान होण्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. परंतु यात रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मृत दात्याच्या अवयवांचा वापर केला होता. परंतु जिवंत रक्तदात्याच्या फुफ्फुसाचा काही भाग कोरोना रूग्णाला बरे करण्यासाठी वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. हिरोशी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या आणि फुफ्फुस खराब झालेल्या रूग्णांसाठी हा आशेचा किरण आहे. जिवंत दात्याकडून अवयवदानाचा काही भाग देऊनही फुफ्फुसांची दुरुस्ती केली जाऊ शकते. सदर महिला रुग्ण जपानच्या कंसाई येथील असून गेल्या वर्षी तिला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून ती लाइफ सपोर्ट सिस्टमवर होती. तिला आपल्या फुफ्फुसांचा काही भाग देणाऱ्या महिलेच्या पती व मुलाची प्रकृती स्थिर आहे.