मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यात आता ओमिक्रॉन या व्हेरिएंटने बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्यांसाठी नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे.
केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमावलीनुसार, सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचार्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी. उर्वरित कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे. सरकारी कार्यालयात गर्दीचे नियोजन करताना अधिकारी आणि कर्मचार्यांचे कामाचे वेळापत्रक ठरवून देण्यात यावे. त्यानुसार कामाची वेळ ९ ते ५.३० आणि १० ते ६.३० या वेळेत कर्मचार्यांचे नियोजन करावे, जे कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात असतील, त्यांना कार्यालयात बोलवू नये.
दिव्यांगांसह गर्भवतींना कार्यालयात येण्यापासून सवलत देण्यात यावी. शक्य असेल तर व्हडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका आयोजित कराव्यात. कार्यालयात मास्क लावणे बंधनकारक असेल. वेळोवेळी सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ३३,७५० कोरोनाबाधित आढळले आहेत. तर १२३ जणांना मृत्यू झाला आहे.
मुंबईत विशेष खबरदारी
मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येने अचानक उसळी घेतल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यापूर्वीच दिले होते. तसेच मुंबईतील कोणत्याही इमारतीत २० टक्के रहिवासी कोरोनाबाधित आढळले, तर ती इमारत सील करण्याचे आदेशही आयुक्त चहल यांनी दिले आहेत.