इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर काही ठिकाणी डेल्टा व्हेरिएंटचा अजूनही परिणाम दिसून येत आहे. एकूणच पाहिले तर सार्स-सीओव्ही-२ विषाणूचा सर्व नागरिकांना संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.
वयस्क नागरिक असो अथवा लहान मुले, या विषाणूने सर्वांना समानरितीने प्रभावित केले आहे. मुलांची विषाणूविरोधातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये सांगण्यात येत असले तरी मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे आरोग्यतज्ज्ञ अजूनही मानत आहेत.
ओमिक्रॉनबद्दल समोर आलेल्या एका अहवालानुसार, मुलांना विशेष धोका नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु मुलांना अद्याप लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलांना इतर वयाच्या नागरिकांच्या तुलनेत विषाणूची बाधा अधिक होऊ शकते. अमेरिकेच्या काही भागात मुलांना बाधा होत असल्याची प्रकरणे वेगाने वाढत आहे. मुलांना संसर्ग झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येत आहेत ते पाहुया.
महामारीची सुरुवात झाल्याच्या काळात जगातील तज्ज्ञांचे मत होते की, मुलांना कोरोनाची बाधा झाल्याच्या प्रकरणात सौम्य लक्षणे दिसू शकतात किंवा लक्षणे दिसूही शकत नाहीत. दुसर्या लाटेदरम्यान लहान मुलांच्या संसर्गाचा दर अधिक दिसून आला होता. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक संक्रामक असल्याचे मानले जात असल्याने मुलांनाही बाधा होण्याची जास्त शक्यता आहे. परिणामी मुलेही अधिक प्रमाणात संक्रमित होऊ शकतात. परंतु यासंदर्भात स्पष्ट आकडा अद्याप समोर आलेला नाही. जगातील बहुतांश मुलांना अद्याप लस देण्यात आलेली नाही. मुलांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
अमेरिकेत वयस्क नागरिकांसह मुलांनाही ओमिक्रॉनची बाधा होत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, इतर वयाच्या नागरिकांप्रमाणे मुलांमध्येसुद्धा कमी-अधिक प्रमाणात तीच लक्षणे दिसून येत आहेत. ताप, थकवा, खोकला आणि गंध आणि चव नसण्यासारखी कोरोनाची लक्षणे मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येत आहेत. काही अहवालांमध्ये मुलांमध्ये मल्टिसिस्टिम इफ्लेमेटरी सिंड्रोमचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. या परिस्थितीत मुलांच्या हृदय, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, पचनयंत्रणा, मेंदू, त्वचा किंवा डोळ्यांसह शरीरातील विविध अवयवांवर सूज येऊ शकते.
जगभरात ओमिक्रॉनचे संक्रमण सुरू आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये खोकला आणि बार्किंग कफ किंवा क्रूप (मुलांना होणार एक घशाचा आजार) ची समस्या दिसत आहे. या परिस्थितीत खोकला येताना त्रास होतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन वरील श्वसन मार्गात संक्रमण विकसित करतो. त्यामुळे क्रूप होऊ शकते. या परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास होतोच, शिवाय खोकला येताना एका विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. सामान्य परिस्थितीत हा त्रास ताप आणि घसा बसल्यामुळे होऊ शकतो.
आरोग्यतज्ज्ञ सांगतात, की इतर नागरिकांप्रमाणे मुलांचे संसर्गापासून रक्षण करण्यासाठीचे उपाय सांगणे गरजेचे आहे. मुलांना बाधा झालीच, तर विलगीकरणात त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गरम, द्रव्य पदार्थ, गरम पाणी देत रहावे. बहुतांश लक्षणे सामान्य घरगुती उपचारांच्या माध्यमातून कमी होऊ शकतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात रहावे. तब्येत जास्त बिघडली तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना – संबंधित माहिती वाचकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी देण्यात येत असून, रिपोर्ट्स आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. वरील उल्लेखित करण्यात आलेल्या आजाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.