नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुस-या लाटेतून सुटकेचा निश्वास सोडत नाही तोच तिसरी लाट येती की काय अशी शंका व्यक्त होत आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये वाढता संसर्ग या शंकेला दुजोरा देत आहे. सध्या आठ राज्यांमध्ये वाढत्या संसर्गामुळे देशाची चिंता वाढली आहे. त्यामध्ये सात राज्ये ईशान्येकडील आहेत. तर दक्षिणेतील केरळ त्यापैकी एक आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१३ जुलै) चर्चा करून परिस्थितीबाबत माहिती घेतली.
चार राज्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर
ईशान्येकडील चार राज्यांमध्ये संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सिक्कीममध्ये पॉझिटिव्हीटी दर १९.५ टक्के, मणिपूरमध्ये १५ टक्के, मेघालयमध्ये ९.४ टक्के आणि मिझोरममध्ये ११.८ टक्के आहे. संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ईशान्येकडील तीन इतर राज्य अरुणाचल प्रदेशमध्ये संसर्गाचा दर ७.४ टक्के, नागालँडमध्ये ६ टक्के आणि त्रिपुरामध्ये ५.६ टक्के आहे. तर आसाममध्ये पॉझिटिव्हीटी दर नियंत्रणात म्हणजेच २ टक्के आहे.
ईशान्येत राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक संसर्ग
देशात कोरोना संसर्गाचा दर २.३ टक्के आहे. त्याच्या तुलनेत ईशान्येच्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर सात पटीने अधिक आहे. देशात ज्या वेगाने संसर्ग फैलावत आहे त्यातुलनेत ईशान्येकडील राज्यात गंभीर परिस्थिती आहे.
केंद्र सरकार सतर्क
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ७३ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर १० टक्के कायम आहे. त्यातील ४५ जिल्हे ईशान्येकडील राज्यांमधील आहेत. या पार्श्वभूमीवर संसर्ग आणि त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्राने गेल्या आठवड्यात या राज्यांमध्ये तज्ज्ञांचे पथक पाठविले होते.
केरळमध्येही रुग्णवाढ
देशाच्या दक्षिणेकडील केरळमध्येही संसर्गाचा दर १०.५ टक्के कायम आहे. दुस-या लाटेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेल्या महाराष्ट्रात ४.१ टक्के, दिल्ली ०.१ टक्के, उत्तर प्रदेश ०.१ टक्के, मध्य प्रदेश ०.१ टक्के या राज्यांची परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
तिसरी लाट सुरू झाल्याचा दावा
ईशान्येकडील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात चार जुलैपासून कोविड-१९ संसर्ग आणि मृत्यूचे पॅटर्न पाहिले तर तोच पॅटर्न फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाला होता, असा दावा हैदराबाद विद्यापीठाचे वरिष्ठ भौतिकशास्त्राचे अभ्यासक आणि माजी कुलगुरू डॉ. विपीन श्रीवास्तव यांनी केला आहे. याच रुग्णवाढीने अखेर देशात गंभीर रूप धारण केले होते. या आधारावर कोरोनाच्या तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांवरील गर्दी कमी झाली नाही, तर तिसरी लाट गंभीर रूप धारण करेल असा इशारा आयएमएने सरकारला दिला आहे.
राज्यांमधील कोरोनाची परिस्थिती
राज्ये संसर्गाचा दर
सिक्कीम १९.५ टक्के
मणिपूर १५ टक्के
मिझोरम ११.८ टक्के
केरळ १०.५ टक्के
मेघालय ९.४ टक्के
अरुणाचल प्रदेश ७.४ टक्के
त्रिपुरा ५.६ टक्के
(स्रोत – कोविड १९ इंडिया डॉट ओआरजी)