इंदूर (मध्यप्रदेश) – सर्दी-पडसे, खोकला, ताप ही कोरोनाची साधारण लक्षणे आता बदलू लागली आहेत. गेल्या काही दिवसांत वरील लक्षणे नसलेले लोक कोरोना रुग्ण म्हणून आढळत आहेत. या लोकांना हात-पाय दुखणे, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसत आहेत. आरटीपीसीआर केल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. कोरोनाच्या बदललेल्या लक्षणांमुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. पोटदुखी, उलटी, जुलाब, अंगदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या जवळपास ४० टक्के रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शंका येताच
लक्षणांमध्ये बदल झाल्यामुळे अशा लोकांना कोरोनाची बाधा होऊ शकते याकडे लक्ष दिले जात नाही. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी रुग्ण घरीच पोटदुखी, अंगदुखीची घरगुती उपाय करतात. तरीही बरे वाटले नाही, तर ते डॉक्टरांकडे जातात. परंतु तोपर्यंत कोरोना विषाणूने शरीराचे नुकसान केलेले असते. थोडी शंका आली तरी त्वरित चाचणी करून उपचार सुरू करावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
वर्षभरात अनेक बदल
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसनतंत्र विभागाचे अध्यक्ष डॉ. सलील भार्गव यांच्यानुसार, कोविडच्या लक्षणांमध्ये वर्षभरात अनेक बदल झाले आहेत. पोटदुखी, जुलाब, मळमळ, उलटीसह अंगदुखी आणि सांधेदुखीसारखे बदल कोरोनाच्या लक्षणात झाले आहेत. यातील अनेक रुग्ण घरगुती उपाय करतात. परंतु अशा लोकांनी कोविडच्या नियमांनुसार औषधोपचार करून घेण्याची गरज आहे.