मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने देशातील सर्व राज्ये सतर्क झाली असून, राज्य सरकारांनी वेगवेगळ्या नियमावली लागू केल्या आहेत. राज्य सरकारांनी जिल्हानिहाय नियम बनवले असून अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये संपूर्ण लॉकडाउन लावण्यात आले आहे. तसेच तामिळनाडू सरकारने राज्यात रात्रीची संचारबंदी, शाळा, महाविद्यालये बंद, कामाच्या ठिकाणी ५० टक्के उपस्थिती, सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांना मर्यादित ठेवणे यासह विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक राज्यात विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. कोणत्या राज्यात काय निर्बंध लावले हे जाणून घेऊया…
महाराष्ट्र
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. त्याअंतर्गत रात्री ११ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नवे नियम रविवारी रात्री बारावाजेपासून लागू होणार आहेत. राज्यात शनिवारी ओमिक्रॉन व्हेरिएंटचे १३३ नवे रुग्ण आढळले. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढून १००९ झाली आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. परंतु मुंबईच्या महापौरांनी विकेंड लॉकडाउन लावण्यास नकार दिला आहे. नव्या नियमानुसार, रात्री ११ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत फक्त कामासाठी घराबाहेर पडता येणार आहे. शाळा-कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. जलतरण तलाव, जिम, स्पा, मैदाने, प्राणी संग्रहालये, वस्तू संग्रहालये, वेलनेस सेंटर आणि ब्यूटि पार्लर, सलून बंद राहणार आहेत.
दिल्ली
दिल्ली सरकारने विकेंड लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांना १४ दिवसांऐवजी सात दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आवश्यक सुविधा वगळून कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्याशिवाय दिल्लीत रात्री दहा ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, सिनेमागृहे, जिम, नाट्यगृहे, सभागृहे, वॉटर पार्क बंद राहणार आहे. मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंदी घालण्यात आली आहे.
तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये तिसरी लाट रोखण्यासाठी रविवारी संपूर्ण लॉकडाउन लावला आहे. विकेंड लॉकडाउनचा या वर्षीचा पहिला लॉकडाउन असेल. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारने पहिल्याच रात्री संचारबंदी घोषित केली आहे. अनेक निर्बंध लावण्यासह रविवारी संपूर्ण लॉकडाउन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान मेडिकल आणि किराणा दुकाने खुले राहतील. पोलिस दलाचे वेगवेगळी पथके परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. मास्क न घालणार्यांना दंड द्यावा लागेल. रेस्टॉरंट खुले राहतील, होम डिलिव्हरी केली जाईल. मॉल, जिम, स्पा आणि नाट्यगृहे बंद राहतील. साप्ताहिक बंदीसह रात्रीची संचारबंदी कायम राहील. रात्रीच्या संचारबंदीचेही नियम लागू राहतील.
राजस्थान
राजस्थानमध्ये जयपूर आणि जोधपूरमध्ये महापालिका क्षेत्रातील आठवीपर्यंतच्या शाळा १७ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील कार्यालयांतील ५० टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. शिक्षण संस्था, कार्यलयांमध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. कार्यालयात कोरोना रुग्ण आढळले तर कार्यालये ७२ तास बंद राहणार आहेत. राज्यात ११ वाजेपासून सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
हरियाणा
सरकारने मॉल आणि दुकानांना एक तास अधिक उघडण्याची सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत गुरुग्राम, फरिदाबाद, अंबाला, पंचकुला, सोनीपत हे जिल्हे रेड झोनमध्ये होते. या जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, सिनेमाघर, मल्टिप्लेक्स, एंटरटेन्मेंट पार्क, प्रदर्शन सभागृहे, बार, रेस्टॉरंट आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद राहील. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणार्या खेळाडूंना सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु प्रेक्षक, समर्थकांना उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उत्तर प्रदेशात बंद कार्यालयात होणार्या लग्नाकार्यात कमाल १०० जण उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. खुल्या जागी होणार्या विवाह समारंभात एकूण क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांना सहभागी होता येणार आहे. राज्य सरकारने दहावीपर्यंत सर्व सरकारी आणि खासगी शाळा ६ ते १४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही जिल्ह्यात एक हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यास रात्रीची संचारबंदी दोन तासांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. सिनेमागृहे, बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट सार्वजनिक ठिकाणे ५० टक्के क्षमतेसह खुली राहणार आहे.
मध्य प्रदेश
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये मोठे मेळावे, कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. ज्या ठिकाणी मोठे मेळावे सुरू आहेत, तिथे जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. तसेच लग्न-समारंभात २५० नागरिक सहभागी होऊ शकतात. अंत्यसंस्कारात ५० टक्के उपस्थिती राहील. रात्रीची संचारबंदी सुरू राहील.
बिहार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बिहारमध्ये २१ जानेवारीपर्यंत रात्री दहा वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात सर्व जिम, मॉल, मंदिर आणि पार्क बंद करण्यात आले आहेत. क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकाने वगळून सर्व दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.