नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतील नवे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. देशातील ४६ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक कायम आहे. तिसर्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. संबंधित राज्यांना जिल्ह्यांमध्ये कठोर नियम लागू करण्यासह लोकांच्या प्रवासावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. केंद्राने १० राज्यांमध्ये दहा टक्क्यांहून अधिक संसर्ग असलेल्या ४६ जिल्ह्यांसह पाच ते दहा टक्के संसर्गाचा दर असलेल्या ५३ जिल्ह्यांमध्येसुद्धा कठोर नियम लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तपासण्या वाढवा
संबंधित राज्यांना कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये तपासण्या वेगाने करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी संबंधित राज्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत एक उच्चस्तरिय आढावा बैठक घेतली. संसर्गाचा दर वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांचा संसर्ग वाढणार्या राज्यांत समावेश आहे. या वेळी राज्यांकडून केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. या राज्यांमध्ये दररोज रुग्णसंख्या वाढत आहे किंवा संसर्गाचा दर वाढत आहे.
अधिक रुग्ण गृहविलगीकरणात
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, या राज्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. हे रुग्ण इतरांच्या संपर्कात येणार नाही यासाठी त्यांच्यावर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामारीवर कसेबसे नियंत्रण मिळवू पाहणार्या आरोग्य मंत्रालयासमोर पुन्हा चिंता वाढल्या आहेत. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार दिवसांमध्ये केरळमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात केरळमध्ये २० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले असून, १०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दररोज ५०० हून अधिक मृत्यू
काही दिवसांपासून दररोज ५०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. सक्रिय रुग्ण चार लाखांच्या खाली आले होते. एका दिवसात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३,७६५ रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळमध्ये वाढत्या आकड्यांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या मनुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे सध्या लशीचे ३.१४ कोटी डोस उपलब्ध आहेत. राज्यांना आतापर्यंत एकूण ४८.७८ कोटी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लवकरच ६८.५७ लाख डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोरोनाची सद्य स्थिती
नवे रुग्ण – ४१,६४९
एकूण रुग्ण – ३,१६,१३,९९३
सक्रिय रुग्ण – ४,०८,९२०
मृत्यू (२४ तासात) – ५९३
एकूण मृत्यू – ४,२३,८१०
बरे होण्याचा दर – ९७.३७ टक्के
मृत्यू दर – १.३४ टक्के
पॉझिटिव्हिटी दर – २.३४ टक्के
तपासण्या (शुक्रवारी) – १७,७६,३१५
एकूण तपासण्या (शुक्रवारी) – ४६,६४,२७,०३८