केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात १,६१,७३६ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या वाढून १,३६,८९००० वर पोहोचली आहे. यादरम्यान आणखी ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १,७१,०५८ वर पोहोचला आहे. एक कोटी २२ लाख ५३ हजारहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहे.
१० राज्यात ८० टक्के रुग्ण
रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण घटून ८९.५१ टक्के झाले आहे. तसेच मृत्यूदर १.२५ टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कमीत कमी १६ राज्यात संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. परंतु १० राज्यात रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळचा समावेश आहे. १.६१ लाख नवे रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण याच राज्यातील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ५१,७५१, उत्तर प्रदेशमध्ये १३,६०४, छत्तीसगडमध्ये १३,५७६ आणि दिल्लीत १३,५०० रुग्णांचा समावेश आहे.
पाच राज्यात ६८.८५ टक्के सक्रिय रुग्ण
सक्रिय रुग्ण सलग ३४ व्या दिवशी वाढले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १२,६४,६९८ इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्येचा दर ९.२४ टक्के आहे. यामध्ये फक्त पाच राज्य ज्यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये ६८.८५ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ४४.७८ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
१४ लाख नमुन्यांची चाचणी
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या माहितीनुसार, कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी सोमवारी देशात १४ लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी केली आहे. या चाचण्यांसह आता एकूण २५.९२ कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.