मुंबई – नोटा आणि नाण्यांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण होते की नाही, याबाबत बरीच चर्चा झाली. अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी १० रुपयाचे काम असेल तरीही ते ऑनलाईन पेमेंटद्वारे करण्याचा प्रयत्न केला. यात डिजीटल पेमेंटचे महत्त्व वाढले आणि प्रमाणही चांगलेच वाढले आहे. मात्र अलिकडेच एका संशोधनात असे पुढे आले आहे की, नोटा आणि नाण्यांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण होत नाही.
युरोपियन सेंट्रल बँकेतील तज्ज्ञ आणि जर्मनीच्या रुहर विद्यापीठातील संशोधकांनी नोटा आणि नाण्यांमधून संक्रमण होण्याच्या शंकेचे निरसन करण्यासाठी संशोधन केले. या संशोधनात स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारच्या नोट, नाणी आणि पीव्हीसीने तयार झालेले क्रेडिट कार्ड ठेवण्यात आले.
संशोधकांनी त्यांना सार्स-कोव्ह-२ या विषाणूशी संक्रमित केले. त्यानुसार स्टीलच्या पार्श्वभूमीवर सात दिवस विषाणू तसेच होते, मात्र नोटा आणि नाण्यांवरून तो दोन ते सहा दिवसांत गायब झाला. नाण्यांवर मात्र एकच तास हा विषाणू राहू शकला. त्यानुसार नोटा आणि नाण्यांमधून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती नाही, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या १५०० पेक्षा जास्त झाली, तेव्हा चीनच्या सर्व बँकांनी निर्देश दिले की, सर्व करन्सी नोट परत घ्या आणि त्या सॅनिटाईज करा. त्यापूर्वी झालेल्या एका संशोधनात काच आणि प्लास्टिकच्या तुलनेत कागद आणि कपड्यांवर हा विषाणू कमी दिवस जिवंत राहतो, असे सिद्ध झाले होते. हा विषाणू काचेवर चार दिवस, प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर सात दिवस जिवंत राहतो.