पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कोरोना कोरोनाचा धोका दिवसागणिक पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. तसेच सातारा येथे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालने अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत तेथे प्रशासनाने आदेश काढले आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. येथेही मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बँका, शाळा, महाविद्यालयात वावरताना अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांना मास्क वापरावा असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. याबराेबरच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून मास्कचा वापर करावा असेही आदेशात म्हटले आहे.
धोकादायक बाब अशी की, सांगली जिल्ह्यातील कारागृहात एका बंदीस काेविड-19 ची लागण झाली. त्यानंतर त्यास तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. संबंधित बंदीच्या संपर्कातील सर्वांची काेविड-19 ची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचा धोका वाढल्याने राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दि. १३ आणि १४ एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण राज्यात कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मात्र ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या. कोरोना असेल तरी ४८ते ७२ तासात रुग्ण बरा होतो, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी काढलेल्या आदेशात सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी उदा. आठवडे बाजार, एस.टी. स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची ठिकाणे इत्यादी जागी सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले आहे.
राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी आणि उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे आदेश दिले. या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तसेच अन्य जिल्ह्यांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Corona Infection Mask Compulsory Collector Order