नवी दिल्ली – कोरोना महामारीची दुसरी लाट संपूर्ण देशभरात फैलावली आहे. परंतु पाच राज्यात लाटेचा वेग सर्वाधिक असल्याने केंद्रासह राज्य सरकार चिंतीत आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या ३२ दिवसांमध्ये सक्रिय रुग्ण संख्या वाढून ११ लाखांहून अधिक झाली आहे. दीड लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळले असून, ८०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्राची स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात सक्रिय रुग्णांमध्ये ६१,४५६ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या ११,०८,०८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्याचा दर संसर्ग झालेल्या रुग्णांच्या ८.२९ टक्के आहे. यात एकट्या महाराष्ट्रात ४८.५७ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
मृतांचा आकडा अधिक
देशात एका दिवसात १,५२,८९७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९०,५८४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामध्ये ८३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३०९ मृत्यूंचा समावेश आहे. गेल्या वर्षी १८ ऑक्टोबरनंतर प्रथमच एका दिवसात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संसर्गग्रस्तांचा आकडा ३३ लाख ५८ हजारांहून अधिकच्या घरात आहे. त्यापैकी १ कोटी २० लाख ८१ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आणि १,६९,२७५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णांचा बरे होण्याचा दर ९०.४४ टक्क्यांवर आला आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे. सध्याचा मृत्यूदर १.२७ टक्के आहे. शनिवारी देशात १,४१,२०४७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. १० एप्रिलपर्यंत हा आकडा मिळून २५.६६ कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली.