नवी दिल्ली – कोरोना महामारीचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर झाला आहे. त्यापैकी एक असलेल्या गर्भवतींवरही कोरोनाचा विपरित परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्ग झालेल्या ४ हजारांहून अधिक गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील १६.३ टक्के महिलांची मुदतपूर्व तर १०.१ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला आहे.
गर्भवती महिलांवर कोरोनाचा काय परिणाम होतो याबाबतचा डाटा जमविण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका (एमसीजीएम), वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग (एमईडीडी), महाराष्ट्र आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ (एनआयआरआरएच) यांच्यातर्फे प्रेगकोविड रजिस्ट्री करण्यात आली होती.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रकाशित झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संशोधकांनी १ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान प्रेगकोविड नोंदणीचा भाग म्हणून राज्यातील १९ ठिकाणी ४२०३ गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांचा अभ्यास आणि त्याचे विश्लेषण करण्यात आले.
राज्यातील १९ महाविद्यालयातून गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिलांची माहिती प्रेगकोविड रजिस्ट्री गोळा करते. पहिल्या लाटेदरम्यान राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तसेच मुंबईतील बीवायएल नायर रुग्णालयातील ४२७६ गर्भवतींच्या माहितीचे विश्लेषण आयजेएमआरमध्ये प्रकाशित करण्यात आले.