मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगासह देशात कोरोना कहर सुरू असताना सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. मात्र या वातावरणातही समाधानकारक वृत्त कानी पडले तर आपल्यामध्येही सकारात्मकता येते. अशीच एक बातमी आहे ज्यामुळे मरगळ आलेल्या उद्योगधंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकेल.
भारताने गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ साली सोन्याच्या आयातीत १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. भारताने १,०५० टन सोन्याची आयात केली आहे. त्यावर एकूण ५५.७ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असून, २०११ या वर्षानंतर सर्वाधिक आहे. कोरोना महामारीमुळे २०२० साली २३ अब्ज डॉलरहून कमी सोन्याची आयात करण्यात आली होती.
आकडेवारीनुसार, २०२० मध्ये भारतात जवळपास ४३० टन सोने आयात करण्यात आले होते. त्याची २२ अब्ज डॉलर इतकी एकूण किंमत होती. तर २०११ मध्ये ५३.९ अब्ज डॉलरचे सोने परदेशातून खरेदी करण्यात आले होते. भारताने २०२० या वर्षात जगातील ३० देशांमधून ३७७ टन सोन्याची आयात केली आहे.
हे आहे कारण
तज्ज्ञांच्या मते, “२०२१ मध्ये परिस्थितीत सुधारणा झाल्याने सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांनी सोन्याची जास्त आयात केली. गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान सणासुदीच्या हंगामात भारतीय नागरिकांनी सोन्याची जोरदार खरेदी केली. त्यानंतर लग्नसराईचे दिवस सुरू झाल्याने यादरम्यानही सोन्याची विक्री वाढली. डिसेंबरमध्ये भारताने ८६ टन सोन्याची आयात केली. गेल्या वर्षी ८४ टन सोन्याची आयात करण्यात आली होती.”
२०२० मध्ये कमी आयात
जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहितीनुसार, २०२० मध्ये लॉकडाउनमुळे सोन्याची सर्वात कमी आयात झाली. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याची सर्वाधित मागणी असते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२१ मध्ये अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला. या वर्षी २३ अब्ज डॉलरहून कमी सोन्याची आयात करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये स्थानिक सोन्याची किंमत विक्रमी ५६,१९१ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्च पातळीवर पोहोचले होते. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये परिस्थितीत सुधारणा झाली. वर्षाच्या सुरुवातीला भारतात किरकोळ ग्राहकांसाठी सोने घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरले.
पुन्हा उसळी शक्य
बाजार तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे अनेक शहरांमध्ये प्रतिबंध वाढविण्यात आल्याने सोन्याची आयात कमी होऊ शकते. त्यामुळे ज्वेलर्सनी सोन्याची खरेदी कमी केली आहे. याचा परिणाम सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच दिसू शकतो. सध्याच्या बाजाराचा कल पाहता २०२२ मध्ये सोन्याची आयात या वर्षीच्या तुलनेत बळकट राहील, अशी तज्ज्ञांना आशा आहे.