नवी दिल्ली – जगभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झालेले आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट इतर देशांमध्ये वेगाने फैलावत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा शंभरहून अधिक देशांमध्ये प्रसार झाला आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ज्या पद्धतीने त्याचा प्रसार होत आहे, तो लवकरच जगातील प्रमुख कोरोनाचा स्ट्रेन होणार आहे.
कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा वेगाने पसरत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे, असे डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले. डब्ल्यूएचओच्या कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत भारताला मॉडर्ना लशीचे ७५ लाख (७.४ लाख ) डोस देण्याची तयारी दाखविली आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेला जबाबदार मानला जाणारा डेल्टा व्हेरिएंट, त्याच विषाणूच्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ४०-६० टक्क्यांपर्यंत अधिक संक्रामक आहे. भारतीय सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स कंसोर्टियम (इंसाकाग) चे सहअध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा सांगतात, देशात सध्या दररोज आढळणार्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण याच व्हेरिएंटचे आहेत. याच व्हेरिएंटमुळे देशातील इतर भागात अजूनही दुसर्या लाटेचा प्रकोप सुरूच असून, दररोज ४० हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत.
कमी वेळेत गंभीर संसर्ग
डॉ. अरोरा सांगतात, जगातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता ब्रिटेन आणि अमेरिकेसह जवळपास १०० देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झालेला आहे. ब्रिटेनमध्ये अल्फा व्हेरिएंटसुद्धा वेगाने फैलावला होता. नंतर ब्रिटेनचे अनेक भाग डेल्टा व्हेरिएंटच्या कवेत आले. कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये म्युटेशनमुळे डेल्टा व्हेरिएंट तयार झाला आहे. माणसाच्या पेशींमध्ये पोहोचून तो वेगाने आपली प्रतिकृती बनवितो आणि कमी वेळेत गंभीर संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतो. डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यानंतर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला आहे.
लसीकरण वेगात तरीही…
दरम्यान, जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून १८.९९ कोटींहून अधिक वर पोहोचला आहे. या महामारीने ४०.८ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना लसीकरण व्यापक स्वरूपात सुरू असतानासुद्धा संसर्गाचा आकडा वाढतच आहे. जॉन हॅपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, जगभरात कोविड प्रतिबंधित लशीचे ३.५९ अब्जांहून अधिक डोस देण्यात आले आहेत.