विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ची लागण झालेला एकही नवा रुग्ण गेल्या २ महिन्यात महाराष्ट्रात सापडलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या या प्रकारच्या विषाणूची लागण झालेले, मे महिन्यात जे २१ रुग्ण सापडले होते, तेवढीच नोंद आतापर्यंत झाली आहे. दिल्लीतील प्रयोगशाळेत यासंदर्भात झालेल्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी’ अहवालातून ही बाब पुढे आल्याची माहिती राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातून ३६०० नमुने ‘जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी’साठी दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यामध्ये मे महिन्यापासून पुढे बाधित आढळलेल्यांचे नमुने तपासण्यात आले होते. तथापि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना जास्त धोका नाही असे म्हटले जात असले तरी त्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर आवटे यांनी नमूद केले आहे.