विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाचा नवा व्हेरियंट (अवतार) डेल्टा प्लस भारतात वेगाने पसरतोय. बघता बघता डेल्टा प्लसचे ६६ रुग्ण भारतात झाले असून त्यातील ३४ तर महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. विशेष म्हणजे डेल्टा प्लसच्याच भितीने महाराष्ट्र सरकारने अचानक पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले व्यवहार आता दुपारी ४ पर्यंतच मर्यादित होण्यामागे डेल्टा प्लसचेच कारण आहे.
दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही डेल्टा प्लसचे संक्रमण असल्याची शंका व्यक्त होत आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टीट्यूट आफ व्हायरोलॉजी येथील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महाराष्ट्रात नवे १४ रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. याचप्रकारे मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये ३ डेल्टाचे रुग्ण असल्याचे आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिसा, राजस्थान आणि जम्मू–काश्मिर याठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. तर दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये या व्हेरियंटचे संक्रमण अद्याप आढळून आलेले नाही.
एक आला दुसरा गेला
भारतात कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट (अवतार) आले आणि गेले. त्यात डेल्टा प्लस आल्यावर गॅमा नावाचा व्हेरियंट गायब झाला. वैज्ञानिकांनी स्वतःच गॅमा व्हेरियंट भारतातून गायब झाल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारीनंतर भारतात अल्फा, बिटा आणि डेल्टा व्हेरियंट भारतात आढळले होते. एप्रिलनंतर डेल्टा प्लसची एन्ट्री झाली. याशिवाय ईटा, लोटा आणि कापा हे व्हेरियंटदेखील भारतात आढळून आले. आता मात्र डेल्टा प्लस वेगाने पसरतोय.