विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोराना विषाणूच्या संसर्गाने आपल्या देशाची चिंता वाढविली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकाराने सर्वांची झोप उडविली आहे. हा विषाणू थेट फुफ्फुसांवरच वाईट परिणाम करत असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत देशातील १२ राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. यात संसर्ग होण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.
विषाणूच्या इतर प्रकारांपेक्षा ‘डेल्टा प्लस’ हा फुफ्फुसांच्या ऊतींशी संबंधित असल्याचे आढळले आहे. यामुळे तो अधिक संसर्गजन्य आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी तशी माहिती दिली आहे. कोरोना विषाणू डेल्टा प्लसचा नवीन प्रकार ११ जून रोजी ओळखला गेला. अलीकडेच याला गंभीर विषाणू प्रकार म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.
आतापर्यंत सुमारे १२ राज्यात डेल्टा प्लसची ५१ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या प्रकारासह संसर्ग होण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात दिसून आले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संदर्भात, एनटीएटीआयच्या कोविड -१९ कार्यकारी गटाच्या प्रमुखांनी सांगितले की, हा इतर प्रकारांपेक्षा फुफ्फुसांशी अधिक संबंधित आहे. परंतु स्पष्टीकरण दिले की, डेल्टा प्लसमुळे गंभीर आजार होणार नाही किंवा तो अधिक संसर्गजन्य नाही.
आणखी काही प्रकरणे ओळखल्यानंतर डेल्टा प्लसच्या परिणामकारकतेविषयीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, परंतु असे दिसून येते की ज्यांना लसीचे एक किंवा दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना संसर्गाची कमी लक्षणे दिसतात. मात्र, हा एक चिंताजनक प्रकार असल्याचे राज्यांना अगोदरच कळविण्यात आले आहे आणि त्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. यासह बरीच राज्यांत ज्या जिल्ह्यांमध्ये विषाणूची ओळख पटली आहे अशा सूक्ष्म पातळीवर योजना तयार करण्यास सुरवात केली आहे जेणेकरून त्यांचा प्रसार नियंत्रित होऊ शकेल, असेही अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.